मुंबई : राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, आणि महाआघाडी सरकार मात्र थंड आहे. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात २५ फेब्रुवारीला राज्यभरात धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

विसंवादातून महाआघाडी सरकार पडले, तरी भाजप कोणाबरोबरही सत्ता स्थापन न करता मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाईल व स्वबळावर सत्ता मिळवेल, या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

राज्यभरातील ४०० तहसील कार्यालयांपुढे भाजप कार्यकर्ते २५ फेब्रुवारीला दिवसभर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून ३८ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असताना रस्त्यांवर खड्डे कसे, हा पैसा कुठे जातो, असा सवाल करीत पाटील यांनी टीका केली. कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावरून  गदारोळ सुरू आहे. त्याबाबत विचारता महाराजांचे महिलांविषयीचे ते वक्तव्य चुकीचे होते. पण महाराज गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे काम करीत असून एखाद्या चुकीसाठी कोणालाही आयुष्यातून उठविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांनी करू नये, अशी विनंती पाटील यांनी केली.