सरकारविरोधी बोललं की ईडीचं लिंबू फिरवलं जातं आहे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडच्या सभेत लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी लाव रे तो व्हिडीओ म्हणत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याचमुळे त्यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. तसेच दुष्काळाचे अनुदानही देण्यात आलेले नाही. पीक विमा भरुनही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला. युपीएच्या सरकारच्या काळात कधीही नीच राजकारण केले गेले नाही.परंतु सध्याचे सरकार नीचपणाची पातळी गाठत आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

शब्दाला जागणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा पवार आहेत. कोर्टाबद्दल आम्हाला आदर आहे परंतु काही नाही तरीसुद्धा अजितदादा पवार यांच्यावर नजर ठेवली जाते आहे. मी पाच वर्षांत या सरकारला उघडं पाडलं आहे.२२ मंत्र्यांचे पुराव्यानिशी भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली.परंतु या भ्रष्टाचाराचे खरेखोटे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका व्यासपीठावर यावे असे जाहीर आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले.

माझ्यासारखे असंख्य पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत तोपर्यंत या मातीतील राष्ट्रवादी कुणीही संपवू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगाखेडच्या जाहीर सभेत धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नींना नजरकैदेत ठेवल्याचा मुद्दा उपस्थित करून लोकांची छळवणूक करणार्‍या सरकारला पायउतार करुन शिवस्वराज्य आणण्याचे आवाहन केले. याशिवाय डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या विविध भ्रष्ट योजनांचा समाचार घेतला. या सभेत आमदार मधुसुदन केंद्रे यांनी आपले विचार मांडले. शिवस्वराज्य यात्रेचा पाचवा दिवस असून दुसरी सभा गंगाखेड येथे पार पडली.