X
X

पालकमंत्र्यांचा दौरा ध्वजवंदनापुरताच !

READ IN APP

महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा केवळ ध्वजवंदनापुरताच ठरला.

गावचावडी बठकीचा विसर
महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा केवळ ध्वजवंदनापुरताच ठरला. गेल्या बठकीत १५ दिवसांनंतर गावागावात चावडी बठका घेण्याच्या त्यांनीच दिलेल्या आदेशाचा त्यांना विसर पडला. विरोधी पक्षाचे नेते जिल्ह्यात दुष्काळ दौरे करीत असताना पालकमंत्री मात्र बेफिकीर असल्याचे चित्र आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर अलिखित बहिष्कार टाकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पालकमंत्री दिलीप कांबळे यांची ओळख ‘झेंडामंत्री’ म्हणून सर्वदूर निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई प्रश्नासोबतच शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवारअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे चालू असताना पालकमंत्री कांबळे १ मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमानिमित्त रविवारी पहाटे हिंगोली शहरात दाखल झाले. पालकमंत्र्यांचे दिवसभर विविध कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते. मात्र, पालकमंत्र्यांचा दौरा ध्वजवंदनापुरताच ठरला.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गेल्या आठवडय़ात हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुरजळ तलावातील गाळ काढण्याच्या कामाला भेट दिली. काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ५ व ६ मे ला दुष्काळी भागाच्या पाहणीस येत आहेत. विविध पक्षांचे नेते जिल्ह्यात दुष्काळी दौरा करीत असताना पालकमंत्री मात्र दुष्काळी स्थितीपासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.
गेल्या टंचाई आढावा बठकीत त्यांनी ग्रामीण भागात गावोगावी १५ दिवसांनंतर चावडी बठका घेऊन ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष समस्या ऐकून घेण्याचे आदेश दिले होते. तसेच टंचाईच्या निवारणार्थ गटविकास अधिकारी, तहसीलदार टंचाईच्या गावांना प्रत्यक्ष भेटी देतील. गावकऱ्यांनी टँकरची मागणी करण्यापूर्वीच दोन दिवसांत टँकरने त्या गावाला पाणी मिळेल, असे सांगितले होते. मात्र, गावागावात अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अजून तरी चावडी बठका घेतल्या नाहीत. पालकमंत्री महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आले असता गावातील चावडी बठकीचे काय, असा साधा प्रश्न त्यांनी केला नाही.
वास्तविक, पालकमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवारअंतर्गत कामे, तलावातील गाळ काढण्याच्या एखाद्या कामाला भेट देणे अपेक्षित होते. मागेल त्याला शेततळे हा कार्यक्रम आज तरी कागदोपत्रीच असल्याचे चित्र असताना पालकमंत्र्यांनी या बाबत कामाचा आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र, पालकमंत्र्यांनी ना दुष्काळावर बठक घेतली, ना जिल्ह्यात कोणत्या कामाची पाहणी केली. ते आले, त्यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला इतकेच. पालकमंत्री सुरुवातीला जिल्हा दौऱ्यावर येताच भाजप पदाधिकारी, कार्यकत्रे मोठय़ा संख्येने त्यांच्यासोबत सर्वत्र मिरवत. इतकेच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या शासकीय बठकीत हजेरी लावण्यास त्यांना कोणाची परवानगी लागत नव्हती. मात्र, पूर्वीच्या गेल्या तीन दौऱ्यांत पालकमंत्री व कार्यकर्त्यांत वेगवेगळ्या विषयावर वाद निर्माण झाले. पहिल्या दौऱ्यात रामरतन शिंदे, दुसऱ्या दौऱ्यात बाबा घुगे, तर तिसऱ्या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांनी आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खोलीतून बाहेर काढल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकत्रे मात्र पालकमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असून त्यांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर अलिखित बहिष्कार टाकला की काय? असे बोलले जात आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कांबळे हिंगोलीत पहाटे आले असता त्यांच्यासोबत दोन-चार कार्यकत्रे मिरविताना दिसले. भाजपचे जुने कार्यकत्रे, तसेच पक्षाचे पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापासून चार हात दूरच राहिले. ध्वजवंदन कार्यक्रमात त्यांनी जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, मागेल त्याला शेततळे अशा विविध योजनांची जुनीच माहिती दिली. ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात काही वेळ विश्रांती घेतली आणि सरळ शहरातून निघून गेले. त्यांच्या दौऱ्यात दिवसभर कार्यक्रम होणार होते. त्या कार्यक्रमाचे काय? कोणते कार्यक्रम होते, अशी आता जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.

22
X