मिर्झा गालिब तसा पाठय़पुस्तकात होता. रट्टा मारून पाठ करायचो. परीक्षेपुरता तेव्हा तो होता. समजायचे नाही तेव्हा. जगत गेलो, तसा गालिब भेटत गेला. काही पदर उलगडत गेले. आजही तोच अनुभव घेतो. तो माणूस म्हणून मांडता आला. आयुष्यात हे काम छान झाले, असे सांगत गुलजार यांनी गालिब औरंगाबादकरांसमोर उलगडून दाखविला आणि औरंगाबादकरांचा रविवारचा दिवस गुलजार झाला.
मिर्झा गालिब या पुस्तकाच्या अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते महात्मा गांधी मिशनच्या रुक्मिणी सभागृहात झाले. या वेळी प्रकाशक अरुण शेवते, अनुवादक अंबरीश मिश्र यांची उपस्थिती होती. या वेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीतून गुलजार यांच्या नजरेतून मिर्झा गालिब अनुभवण्याचा योग उपस्थितांना मिळाला.
गंगा-जमुनी संस्कृती असणाऱ्या याच गावात वली औरंगाबादी होते. या पुढे गुलजार औरंगाबादी म्हटले तर आनंदच होईल, असे सांगत गुलजार यांनी औरंगाबादकरांना जिंकून घेतले. भाषणाची सुरुवातच गुलजार यांनी गालिबच्या नजाकतीने केली. पिछले गुनाहो की म माफी मांगू तो, अगले गुनाह करू, असे म्हणत त्यांनी भाषणास सुरुवात केली. पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम अडीच महिन्यांपूर्वी होणार होता. मात्र, गुलजार यांची प्रकृती अस्वास्थाने तो पुढे ढकलला गेल्याचा या वाक्याला संदर्भ होता. औरंगाबाद हे शहर एका अर्थाने उर्दू भाषेचे जन्मस्थान असल्याचा ओझरता उल्लेख करत त्यांनी गालिब आता मराठीत बोलायला लागल्याचे सांगितले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनतर मिर्झा गालिब पुस्तकाचे अनुवादक व पत्रकार अंबरीश मिश्र यांनी गुलजार यांना बोलते केले. गालिबला चाचा असे संबोधत आजच्या काळात ते कसे सुसंगत ठरतात हे सांगितले. प्रेम सगळे करतात पण व्यक्त करताना इश्क पर जोर नही किसिका असे म्हणत गालिबची आठवण येते, असे ते म्हणाले.
जेवढे लिहिता येईल, दाखविता येईल तेवढेच ते असावे असा आग्रह सकस साहित्यात महत्त्वाचा भाग असतो असे ते म्हणाले. दूरदर्शनवर मिर्झा गालिब साकारताना १७ भागच होऊ शकले. खरे तर ते वाढविण्याची मुभा होती. पण तसे करणे चुकीचे ठरले असते असे सांगत कमी शब्दांत चित्र उभे करणे कसे जमले, याची माहिती दिली.
मिर्झा गालिबच्या प्रतिमा, भाषा, मांडणीची ताकद या पेक्षाही त्याचे व्यक्त होणे नेहमीच आवडल्याचे सांगताना गालिब कसे रसरसून जगले. जगण्याच्या प्रत्येक प्रांतात शुध्दता जपणारा गालिब गुलजार यांना कसा दिसला याची उदाहरणे त्यांनी सांगितली. अगदी जुगार खेळणारे आणि अगदी मद्य पितानाही या माणसाने पारदर्शकता जपली. ते जगणेच लिहिण्यात आल्याने मिर्झा गालिब जीवनात सर्वस्पर्शी ठरतो, असेही ते म्हणाले. या वेळी प्रकाशक अरुण शेवते, यशवंतराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केले.
उर्दूची चिंता नाही
भाषिक अर्थाने उर्दूची चिंता वाटते का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, असे असते तर औरंगाबादमध्ये एवढे रसिक जमाच झाले नसते. लिपी दिसत नसेल कदाचित पण भाषा समाजात मिसळलेली असते. ती काढता येत नाही. सध्या चित्रपटातील भाषेला आपण िहदी म्हणत असलो तरी त्याचा ८० टक्के भाग उर्दूने व्यापलेला आहे. महात्मा गांधी म्हणत, उर्दूला हिंदुस्थानी असे संबोधले जावे. ते काही उगीच नव्हते. त्यामुळे या भाषेवर कोणतेही संकट नाही. लिपितील बदल दिसत नसतील तर ती संकुचितता म्हणावी लागेल, असेही ते म्हणाले.
संस्कृती सांभाळण्याची चिंता
जागतिकीकरणात होणारे बदल हे वाईट नाहीत. पुढची पिढी आमच्या पिढीपेक्षा चांगला विचार करते आहे. तरुण जगण्याला फार थेटपणे भिडतो आहे. ती पारदर्शकता जगण्यात आहे. जुन्या पिढीतील खोटेपणा तो सोडून देतो आहे. हे चांगले नाही का? फक्त जे चांगले आहे. ते टिकून रहावे, या विषयी मात्र काही शंका आहेत. त्यामुळे सांस्कृतिक आक्रमण वगरे असले शब्द न म्हणता त्याला मानवी उत्क्रांतीच्या पातळीवर बघायला शिकले पाहिजे असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
गालिब म्हणजे शुध्दता, पारदर्शकता- गुलजार
मिर्झा गालिब या अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाले. या वेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीतून गुलजार यांच्या नजरेतून मिर्झा गालिब अनुभवण्याचा योग उपस्थितांना मिळाला.

First published on: 22-12-2014 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulzars interview by ambarish mishra