अवकाळी पावसाने हात आकडता घेतल्याचे चित्र इतरत्र असले, तरी नांदेड जिल्ह्य़ात गुरुवारी आठव्या दिवशीही कहर कायम होता. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दुपारी झालेल्या पावसाने जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले. बहुतेक भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नांदेड शहरात झालेल्या पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले.
गेल्या आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. वादळ-वाऱ्यासह होणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती झोप उडवली असली, तरी वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. वादळवारा व गारपिटीसह होणाऱ्या पावसाने जनजीवनही पूर्णत: विस्कळीत झाले आहे. महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मुखेड, हिमायतनगर, कंधार, किनवट, माहूर तालुक्यात अनेक गावातील वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. महावितरणचे अधिकारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत असताना, पावसाचा अडसर ठरत आहे.
सकाळी वातावरणात गारवा होता. सूर्यदर्शनही उशिरा घडले. दुपारी दोनपर्यंत कडक ऊन असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि पाऊस धो-धो कोसळला. तब्बल तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. दत्तनगर, नंदीग्राम सोसायटी, पिरबुऱ्हाणनगर, श्रीनगर, शिवशाहीनगर, छत्रपती चौक, वामननगर आदी भागात पाणी साचले होते. कंधार तालुक्यातील पानशेवडी, कंधारेवाडी, भोकर, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात गारपीट झाली.
नुकसानीचा आलेखही दिवसागणिक चढताच!
वार्ताहर, लातूर
गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो एकर क्षेत्रातील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले असले, तरी जवळपास दररोज होत असलेल्या पावसामुळे यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
जिल्हय़ातील ५३७ गावात ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज बुधवारी जाहीर झाला. मात्र, सायंकाळी निलंगा, चाकूर तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. गतवर्षी मार्च महिन्यात जिल्हाभर गारपीट झाली होती. या वर्षी एक महिना पुढे जाऊन अवकाळीने एप्रिलमध्ये हजेरी लावली. यात रब्बी हंगाम व फळबागांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार लातूर तालुक्यातील ६४ गावांना गारपिटीचा तडाखा बसला. यात ४०४ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, आंबा पिकांचे, ३७५ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे, १ हजार ३५४ हेक्टर क्षेत्रातील धान्य पिकाचे नुकसान झाले. निलंगा तालुक्यातील १३५ गावात १९५ हेक्टरवरील फळबाग, १५२ हेक्टर भाजीपाला, तर १७५ हेक्टर रब्बीचे नुकसान झाले. एकूण ५२२ हेक्टरच्या वर नुकसान आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३३ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले. रेणापूर तालुक्यातील ५६ गावात ६० हेक्टरवर फळपिके, २८ भाजीपाला, तर १४० हेक्टरवर धान्य पिकाचे नुकसान झाले. देवणी तालुक्यातील ३८ गावात सुमारे १८३ हेक्टरवर नुकसान झाले. जळकोट २५ गावातील ११० हेक्टर, अहमदपूर ७९ गावात २२९ हेक्टर, औसा ६३ गावात सुमारे ४८७ हेक्टर, उदगीर २५ गावात १२५ हेक्टर, तर चाकूर तालुक्यात ५२ गावातील २७२ हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले. मात्र, रोजच्याच पावसामुळे पंचनामे करण्यासही विलंब लागत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2015 रोजी प्रकाशित
नांदेडात आठव्या दिवशीही गारपीट
अवकाळी पावसाने हात आकडता घेतल्याचे चित्र इतरत्र असले, तरी नांदेड जिल्ह्य़ात गुरुवारी आठव्या दिवशीही कहर कायम होता. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दुपारी झालेल्या पावसाने जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले.
First published on: 17-04-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm in nanded