मालकीहक्कावरून वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय महामार्गानजीकच्या तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने सोमवारी हातोडा घातला. अतिक्रमण मोहीम राबवताना गांधीनगरातील धनाढय़ व्यापा-यांकडून विरोध झाला, पण तो कठोरपणे मोडून काढत प्रशासनाने आपला इरादा तडीस नेला. दिवसभरात शेकडो अतिक्रमणे हटवण्यात आली असून, अकरा बडय़ा इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ही मोहीम आठवडाभर सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व-पश्चिम भागात अनेक इमारती बेकायदेशीररीत्या उभारण्यात आल्या आहेत. उचगाव व गांधीनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा असल्याचा सोयीस्कर समज घेऊन इमारती बांधण्यात आल्या होत्या. मात्र ही जागा कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील आहे हे अलीकडेच न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमणे हटवण्याची मोहीम घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार सकाळपासूनच महापालिकेची यंत्रणा तावडे हॉटेल परिसरात जमली होती. राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील गांधीनगरकडे जाणा-या भागातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली.  
जेसीबी मशिन, डंपर, ट्रॅक्टर, अग्निशामक दल असा फौजफाटा घेऊन महापालिकेचे उपायुक्त आणि अधिकारी आणि शेकडो कर्मचारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. मोठा फौजफाटा घेऊन महापालिकेने श्री हरि ओम एंटरप्रायझेस, भवानी एंटरप्रायझेस, रत्नप्रभा मार्केटिंग, लक्ष्मी एजन्सीज, एल. जी. शोरूम या अतिक्रमणावर हातोडा घालून ही कारवाई अशीच सुरूच ठेवली आहे.
तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली असून, यामध्ये सुमारे २४ एकरांतील १३३ मिळकतधारकांच्या १०९ इमारती आहेत. ही जागा महापालिका व राज्य शासनाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार महापालिकेच्या मालकीचीच असून, ती जागा ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व ना विकास क्षेत्र अशा कारणांसाठी आरक्षित आहेत.
गांधीनगर परिसरातील मोठमोठय़ा इमारती जमीनदोस्त होऊ लागल्याने व्यापा-यांमध्ये घबराट पसरली. अतिक्रमण काढताना काही ठिकाणी वादावादीचा प्रकार घडला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत कारवाई मात्र सुरूच ठेवली. तर अतिक्रमण पाडण्याची ही मोहीम पूर्णपणे बेकायदेशीर असून ही कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी उचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महापौर सुनीता राऊत यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ९० पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त तनात करण्यात आला होता. महापालिकेने राबवलेल्या या धाडशी मोहिमेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे यांच्यासह पवडीचे २५०हून अधिक कर्मचारी, सर्व विभागीय कार्यालयांचे कर्मचारी सहभागी झाले होते. महापौर सुनीता राऊत, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, रमेश पोवार, सत्यजिीत कदम, निशिकांत मेथे, दिगंबर फराकटे, रविकिरण इंगवले, वसंत कोगेकर यांनीदेखील या कारवाईची पाहणी केली आणि सूचना केल्या. तथापि काही नगरसेवकांच्या हलचाली अर्थपूर्ण असल्याचे जाणवत होते.