हसन मुश्रिफ यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवक फोडाफोडीसह कु रुंदवाड नगरपालिकेत झालेल्या घोडेबाजारामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या नोटांचा छापखाना कोल्हापुरातच  आहे, असे  वाटायला लागले आहे, अशी उपरोधिक टीका  आमदार हसन मुश्रीफ यांनी केली . त्यांचा इशारा पालकमंत्र्यांना उद्देशून होता . वडकशिवाले ता. आजरा येथे जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील घोडेबाजार रोखण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा  आढावा मुश्रीफ यांनी घेतला . ते पुढे म्हणाले, की राजकारणातील आर्थिक घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी कोल्हापुरात व्यापक बैठक झाली होती.  त्या वेळी मी स्वत: , महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, विनय कोरे, सतेज पाटील या सर्वानी यापुढे घोडेबाजार करायचा नाही. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावून कोल्हापूर शहराच्या विकासावर दुष्परिणाम होतो , अशी चर्चा झाली होती. त्यामुळे पक्षीय निवडणुका लढविल्या जातील, जेणेकरून  पक्षांतर बंदी विधेयक कायद्यामुळे नगरसेवक अशा कृत्यांना धजावणार नाहीत अशीही चर्चा झाली होती. परंतु आता मात्र फु टीरांना प्रोत्साहन दिले जात असून अशांना अपात्र होणार नाही याबद्दल हमी देवून सर्रास फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीत प्रत्येकी दीड कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले . आता महापौर निवडीसाठी पाच कोटी रुपयांच्या बॅगा तयार असल्याचे वृत्त आहे.  कु रुंदवाड नगरपालिकेत  स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी तीन नगरसेवकांना प्रत्येकी वीस लाख रुपये दिल्याचेही समजते. धनाच्या  जोरावर उसळी घेणारी ही प्रवृत्ती घातक  आहे .

त्यांच्या दारात घाण ओतू

कोल्हापूर शहर आणि जिल्’ात सुरु असलेल्या या वारेमाप पैशाच्या वापराबद्दल व घोडेबाजाराबद्दल कालच कोल्हापुरातील डाव्या विचारांचे कार्यकर्ते आपल्याला भेटून त्यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. त्या कार्यकर्त्यांची भूमिका अशी होती की, कोल्हापूर सारख्या वैचारिक दिशा असणाऱ्या शहरात हे असले प्रकार निंदाजनकच आहेत. हे घाणेरडे प्रकार तातडीने थांबले नाहीत तर, असे प्रकार करणाऱ्यांच्या दारात घाणीच्या बुटय़ा ओतू असा इशाराही त्यांनी दिल्याचे मुश्रीफ  म्हणाले.