दर महिन्याला कामगारांची आरोग्य तपासणी 

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर जिल्ह्यतील वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित लाभार्थ्यांंसाठी दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.  यामुळे मातामृत्यू, बालमृत्यू नियंत्रणात आणण्यास मदत होणार असून कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

यंदाच्या हंगामात जिल्ह्यतून ३३ हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे.  त्यामध्ये ११५४ गरोदर माता, ५६९ स्तनदा माता, १२८४ किशोरवयीन मुली, ८१८५ सहा वषार्ंखालील मुले व त्यापैकी ३७९ अति तीव्र कुपोषित  व ४३४ मध्यम तीव्र कुपोषित  बालकांचा समावेश आहे. स्थलांतरित होणारे अधिकतर ग्रामीण भागातील नागरिक हे वीटभट्टय़ांवर काम करत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

सद्यस्थितीत यापैकी १२ हजारहून अधिक स्थलांतरित नागरिक त्यांच्या मूळ गावी परतले असले तरी कुपोषित असलेले अधिकतर मुले अजूनही स्थलांतरित ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. पालघर जिल्ह्यत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून उपकेंद्र अंतर्गत १७३ समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांंची राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता विषयक बाबी अपुरी असल्याने त्याचा परिणाम लाभार्थ्यांंच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे बालकांच्या कुपोषणामध्ये वाढ होऊन बालमृत्यू  करण्याचे प्रकार होत असतात.

स्थलांतरित लाभार्थ्यांंना महिन्यात किमान एक वेळा आरोग्याची तपासणी व्हावी म्हणून दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी अशा लाभार्थ्यांंसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सलिमाठ यांनी दिले आहेत. आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी एकत्रितपणे आयोजन करण्याचे सूचित करण्यात आले असून अशा स्थलांतरित लाभार्थ्यांंच्या आरोग्य शिबिरासाठी समन्वयक (नोडल) अधिकाऱ्यांची तालुकानिहाय नेमणूक करण्यात आली आहे. अशा शिबिरामुळे जिल्ह्यतील कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त होणार असून बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल असे जिल्हा प्रशासनाला वाटत आहे. अशा शिबिरांचे आयोजन केल्यानंतर त्याचा अहवाल संबंधितांना सादर करण्याचे देखील सूचित करण्यात आले आहे.