सध्या राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच मुंबईतल्या बाधितांना शहराबाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील आरोग्यसेवेसाठी लष्कर, रेल्वे आणि इतर संस्थांची मदत घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. यावेळी त्यांनी सर्वांना आपल्या वर्तणुकीत बदल करण्याचा सल्ला दिला. एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली याचा अर्थ काही गुन्हा केल्यासारखा होत नाही. लोकांनीही आपल्यात करोनाची काही लक्षण दिसल्यास त्वरित रुग्णलायांशी संपर्क साधावा. मनात कोणतीही शंका बाळगू नये. मुंबईत २ हजार बेड्सचं रुग्णलाय उभारण्यात येणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स आणि गोरेगावात रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले.

रुग्णांनी करोनाची कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित रुग्णालयात यावं. लोकं रुग्णालयात उशिरा येत असल्यामुळेच मृत्यूचं प्रमाण अधिक दिसत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सर्व रुग्णालयांनाही इशारा दिला. रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांना त्यांनी यावेळी इशारा दिला. सरकारनं घालून दिलेल्या कॅपिंगनुसारच रुग्णालयांना बिल आकारावं लागेल. तसंच अतिरिक्त पैसे घेतल्यास तक्रार करण्यासाठी यंत्रणा तयार केल्याचंही त्यांनी सांगितलं.

आरोग्य विभागातील जागा भरणार

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागातील एकही पद रिक्त राहू नये अशी मी मागणी केली आहे. त्या जागा लवकरात लवकर भरल्या जातील. त्यासाठी आवश्यकता असल्यास तंत्रज्ञानाची मदतीही घेतली जाईल, असं टोपे म्हणाले. सध्या पावसाळ्याचा कालावधी जवळ आला आहे. पावसाळ्यातही बळावणारे इतर आजार आहेत. आपल्याला त्या दृष्टीनंही काम करावं लागणार आहे. राष्ट्रीय कार्यक्रमात ज्या गोष्टी आहेत. त्यादेखील राबवाव्या लागणार आहेत. त्यादृष्टीनंही रुग्णालयांना आता काम करावं लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.