दीड तासात ११८ मिमी.पावसाची नोंद ; ग्रामीण भाग कोरडाच

सोलापूर : सलग तिसऱ्या वर्षीही पावसाने मोठीच निराशा केल्यामुळे दुष्काळाचे सावट कायम राहिलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात एकीकडे ग्रामीण भाग कोरडाठाक असतानाच दुसरीकडे सोलापूर शहरात काल रविवारी रात्री उशिरा वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. अवघ्या दीड तासात तब्बल साडेचार इंच म्हणजे ११८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या कोसळधारांमुळे शहराच्या सखल भागात प्रचंड प्रमाणात पाणी शिरले होते. काही भागात रस्त्यांवर पाणी इतके वाढले होते की, तेथे बराच वेळ वाहतूक थांबवावी लागली. नाल्यांना तर दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे स्वरूप आले होते.

गेल्या आठवडय़ात शहरासह ग्रामीण भागात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावली होती. त्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळाला असताना तिसऱ्या दिवशी पाऊस पुन्हा गायब झाला होता. त्यामुळे निराशेचे चित्र कायम असतानाच काल रविवारी रात्री अकरानंतर शहर व परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. या धुवांधार पावसाने सतत दीड तास दमदार हजेरी लावली. पहाटेदेखील पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. विशेषत: सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी शिरले होते. मुरारजी पेठेतील जुनी मिल चाळ, नरसिंग गिरजी मिल चाळीसह निराळे वस्ती, हांडे प्लाट्स, वसंत विहार परिसर आदी भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. सोलापूर रेल्वे स्थानकासमोरील ९० वर्षे जुन्या काडादी चाळीतही अनेक घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने तेथील रहिवाशांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली होती.

या चाळीसमोरील मुख्य रस्ता रेल्वे स्थानकापासून मोदी खान्याकडे जातो. या मुख्य रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी वाढले होते. त्यात रस्त्याचे दुभाजकही पाण्याखाली गेले होते. तेथून जवळच असलेल्या कुमार चौक, पोर्टर चाळ आदी भागात पावसाच्या पाण्यामुळे हाल सोसावे लागले. तेथील वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त दीपक तावरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. अग्निशामक दलासह अन्य यंत्रणाही धावून आल्या होत्या.  पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील बरेच नाले नदीसारखे तुडूंब भरून वाहू लागले होते. नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर तसेच आसपासच्या घरांमध्ये घुसल्याचे चित्र पूर्व भागात पाहावयास मिळाले. तेव्हा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे रातोरात मदतीसाठी धावून आल्या. बऱ्याच भागात पाणी शिरले, तेव्हा मदतकार्यासाठी लोकप्रतिनिधी रात्रभर कामाला लागले होते. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मोठीच निराशा केली असताना काल रविवारी एकाच रात्री पडलेला सुमारे साडेचार इंच पाऊस हंगामातील सर्वात मोठा होता. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरूच होता. वादळी वारेही सुटले होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही भागात जुन्या घरांच्या भिंती कोसळल्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

तथापि, हा दमदार पाऊस केवळ शहरी भागातच पडल्याचे दिसून आले. लगतच्या उत्तर सोलापूर तालुक्यात २५.६० मिमी तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ६ मिमी इतकाच पाऊस पडला. उर्वरित ग्रामीण भागात कोठेही पावसाची हजेरी लागली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात निराशा कायम आहे. पावसाळा संपायला आणखी काही दिवस शिल्लक असताना जिल्ह्य़ात आतापर्यंत केवळ ३९ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. माळशिरस या एकाच तालुक्यात ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित भागात पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे सावट कायम आहे. मंगळवेढा भागात तर केवळ २४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. अक्कलकोट (२७ टक्के), मोहोळ (३२ टक्के), करमाळा (३४ टक्के), माढा (३४.५१ टक्के),  पंढरपूर (३६ टक्के) आदी तालुक्यांमध्ये पाऊसमान अत्यल्प आहे.