यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत मोठे नुकसान; भंडाऱ्यात वीज कोसळून मुलाचा मृत्यू

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हय़ांत हाहाकार माजवला आहे. पावसाने प्राणहानीबरोबरच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. भंडाऱ्यात वीज कोसळून प्रशांत बागडे (१०) या मुलाचा मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्हय़ातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने कहर केला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

एक हजारावर घरांची पडझड झाली असून, अनेक गावे पुरांनी वेढली आहेत. जिल्हय़ात साथीच्या रोगांचाही उद्रेक होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॉलरा, डेंग्यू आणि अतिसाराचे रुग्ण वाढत आहेत.

चंद्रपूर जिल्हय़ात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून, नदी-नाल्याशेजारील कापूस, धान, तूर, सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. गोंडपिपरी तालुम्क्यातील वेडगाव, पोडसा, सकमुर, सोनापूरचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोली जिल्हय़ात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भामरागड तालुक्यातील अनेक गावे संपर्काबाहेरच आहेत. गोंदिया-भंडारा जिल्हय़ात मुसळधार पाऊस सुरू असून भंडाराजवळील शहापुरात घराच्या छतावर खेळत असलेल्या प्रशांत बागडे या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला.