नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, बचावपथके दाखल

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरला गेल्या चोवीस तासांत पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आले आहेत. अनेक नद्यांची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने सुरू झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासांत विक्रमी ४८० मि. मी. पाऊस झाला तर कोयना धरणात एका दिवसात तब्बल साडेचौदा टीएमसी पाणी जमा झाले. पंचगंगेच्या पुरामुळे खबरदारी म्हणून नदीकाठच्या भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्य़ातही पावसाने हजेरी लावली आहे.

महाबळेश्वरमध्ये विक्रमी ४८० मि. मी. पाऊस

वाई : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती. यामध्ये महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासात तब्बल विक्रमी ४८० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे महाबळेश्वरचे जनजीवन विस्कळीत झाले असून कृष्णा, कोयना, वेण्णा आदी नद्यांना पूर आले. महाबळेश्वर तालुक्यातील चतुर बेट व उचाट येथील पूल पाण्याखाली गेल्याने २८ गावांचा संपर्क तुटला आहे.

सातारा जिल्ह्य़ात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये कालपासून पावसाचा जोर मोठय़ा प्रमाणात वाढला. यामध्येही महाबळेश्वर, पोटण, वाई, जावली, सातारा, कराड, कोरेगाव तालुक्यात या पावसाचा जोर मोठय़ा प्रमाणात होता.

महाबळेश्वर तालुक्यात या पावसाचे प्रमाण प्रचंड मोठे होते. गेल्या चोवीस तासात येथे तब्बल ४८० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने महाबळेश्वरचे जनजीवन विस्कळीत झाले असून कृष्णा, कोयना, वेण्णा आदी नद्यांना पूर आले. नदी, नाले, ओढय़ांना पूर आले आहेत. या पाण्याने पुढे वाई, सातारा परिसरात नदी काठालगत पूरस्थिती तयार केली आहे. वेण्णा तलाव भरून वाहत आहे. महाबळेश्वरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पाणी भरल्याने वाहतूकही काही ठिकाणी विस्कळित झाली होती. आंबेनळी घाट व पसरणी घाटात छोटय़ा—मोठय़ा दरडी कोसळल्या आहेत. आंबेनळी घाटात दरडी कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावरील धबधबे ओसंडून वाहत असून घाटरस्त्यावर संपूर्ण पाणीच पाणी होते.

वाई तालुक्यातील दुर्गमभाग जांभळी येथील झरफाळे वस्तीजवळ आज येथे पहाटे मोठय़ा प्रमाणावर भूस्खलन झाले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरकडा घसरून खाली आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून १२ जणांचे जीव यातून वाचले आहेत. अन्यथा माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती.

मोरणा गुरेघर धरण  परिसरात पावसाचा जोर वाढला असून, रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून २०४० क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मुसळधार संततधार पावसाने वाई तालुक्यातील बलकवडी धरणात दहा हजार तर धोम धरणात पंधरा हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे.

यामुळे  धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या सर्व भागात जोरदार पाऊस सुरू असून अनेक तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत, ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या मागील दोन दिवसातील पावसाने साताऱ्यात सर्वत्र  पाणीपातळीत वाढ झाली असून शेतकऱ्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज वाहक खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला नसल्याचे जाणकारांनी सांगितले. महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत सर्वत्र संचारबंदी सारखी परिस्थिती होती. अशाही वातावरणात अनेक हौशी पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते. महाबळेश्वर तालुक्यातील चतुर बेट व उचाट येथील पूल पाण्याखाली गेल्याने २८ गावांचा संपर्क तुटला आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनास तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वर येथे आज प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले आणि आपत्कालीन बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी तहसीलदार सुषमा पाटील उपस्थित होत्या.

सोलापुरात पावसाची रिपरिप सुरूच; ‘उजनीमध्ये पाणीसाठा वाढला

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मागील आठवडय़ापासून सर्वदूर असलेली पावसाची रिपरिप सुरूच आहे. हा पाऊ स खरीप पिकांना पोषक मानला जातो. तर दुसरीकडे भीमा-निरा खोऱ्यात गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाला होत आहे. वजा २२ टक्के असलेला धरणातील पाणीसाठा वाढून बेरजेच्या पुढे वाटचाल करीत आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ५.७ मिलीमीटर पाऊ स झाला. बार्शीत १२.१ मिमी, उत्तर सोलापुरात ८.३, दक्षिण सोलापुरात ७.९, अक्कलकोटमध्ये ७.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसात जोर नसला तरी अधूनमधून पावसाचा जोरदार सडाका होतो. आतापर्यंत जिल्ह्यात २६४ टक्के पाऊ स झाला आहे. भीमा व निरा खोऱ्यात पावसाचे काल बुधवारी पुनरागमन झाले असून गुरुवारी सकाळपर्यंत तेथील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊ स झाला आहे. त्यामुळे वरच्या धरणातून उजनी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दहा हजारांपर्यंत वाढविण्यात आला होता. त्यामुळे वजा २२ टक्के पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात वजापातळी संपुष्टात येऊ न पाणीसाठा बेरजेच्या पुढे जाण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. सकाळी आठपर्यंत धरणात वजा १.३० टक्के पाणीसाठा होता. त्या वेळी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ९७०० क्युसेक इतका होता. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम प्रकल्पातही पाणीसाठा ५० टक्कय़ांपर्यंत वाढला आहे.