हिवाळ्याची चाहूल लागलेली असताना पाऊस अद्यापही राज्यात मुक्कामाला असून, रविवारी सायंकाळी सातारा, कोल्हापूर, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरून पुण्याकडून सातारा, कोल्हापूरकडं जाणारी वाहतुकही मंदावली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान होत असून, मतदानांची टक्केवारी घसरण्याचं सावट घोंगावू लागलं आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा पावसानं शांत केला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्यात उद्या (२१ ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, त्यात पाऊसामुळे व्यत्यय येण्याची चिन्ह आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या टक्केवारालाही याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जास्तीत जास्त मतदान करून घेणं हे उमेदवारांसमोर नवं आव्हान असणार आहे. त्यापूर्वी साताऱ्यात निवडणूक साहित्य वितरण केंद्राच्या परिसरात पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पावसामुळे असंख्य समस्यांना सामोरं जावं लागलं.

दरम्यान, रविवारी सायंकाळी पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीसह राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. साताऱ्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कोल्हापुरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. गेल्या तासाभरापासून शहरात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर पकडला आहे. पुण्यातही कालपासून पाऊस होत आहे. रविवारी सायंकाळी पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. मुंबई वेधशाळेने पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.