सिंधुदुर्गात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून जाऊन तिघांचा बळी गेला आहे. आज दोघांचे मृतदेह आढळून आले. या अतिवृष्टीमुळे खारेपाटण, देवगड या भागांत घरांत व दुकानांत पाणी भरून नुकसान झाले. खारेपाटणमधील घरे, बाजार पाण्याखाली गेला, पण आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. वेंगुर्ले देऊळवाडा येथील चंद्रकांत रामचंद्र कदम (४५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नेरुरतर्फे कुटगाव येथील गुरुदास शंकर ठाकूर (५८) व सावंतवाडी माजगाव येथील दत्तप्रसाद मोहन सावंत (२३) हे ओहळात वाहून गेले होते. हे दोघेही आढळून आले आहेत. अतिवृष्टीचे चंद्रकांत कदम (वेंगुर्ले), गुरुदास ठाकूर (कुडाळ) व दत्तप्रसाद सावंत (सावंतवाडी) बळी ठरले. पाण्याच्या महापुरात ते वाहून गेले होते. खारेपाटण बाजारपेठेतील रहिवासी जिल्हा परिषद माजी सदस्य जयंत तळगावकर यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. तळगावकर यांच्या घराला पाण्याने वेढा दिल्याने त्यांचे पार्थिव घराच्या मजल्यावर ठेवले होते. स्मशानभूमीही पाण्याखाली गेल्याने दुसऱ्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात खारेपाटण, देवगड, सावंतवाडी, कुडाळ या भागांतील ग्रामीण भागाला पावसाने झोडपल्याने मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले जात आहेत.