News Flash

अतुलजींना शुभेच्छा! अशी कितीही पत्र द्या, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही -उदय सामंत

कालही विद्यार्थ्यांसोबत होतो...

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत. (संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे विद्यापिठीय परीक्षांचा निर्णय कोडींत सापडला आहे. करोनामुळे राज्यातील परिस्थिती परीक्षा घेण्यासारखी नसल्याची भूमिका राज्य सरकारकडून मांडली जात आहे. तर दुसरीकडे परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं नवीन नियमावली जारी केली आहे. त्यातच विरोधी बाकांवरील भाजपाकडूनही परीक्षा घेण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. दरम्यान, उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र अतुल भातखळकर यांनी राज्यपालांना पाठवलं होतं. त्या पत्रावरून उदय सामंत यांनी भातखळकर यांना टोला लगावला आहे.

राज्यातील विद्यापिठीय परीक्षा न घेण्याच्या निर्णयांचा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून वारंवार पुनरुच्चार केला जात आहेत. त्यातच सामंत यांनी राज्यातील कुलगुरूंच्या निवेदनाचा हवाला देत परीक्षा घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं. तसेच उदय सामंत यांना पदावरून दूर करावं, अशी मागणी केली.

या पत्रावरून उदय सामंत यांनी अतुल भातखळकर यांना टोला लगावला आहे. सामंत यांनी एक ट्विट केलं असून, “अशी कितीही पत्र द्या, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार… अतुलजींना शुभेच्छा,” असं म्हणत सामंत यांनी भातखळकरांना टोला लगावला.

राज्यपालांना दिलेल्या पत्रात भातखळकरांनी काय म्हटलंय?

भातखळकर यांनी राज्यपालांना एक पत्र दिलं आहे. “राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी असा दावा केला होता की, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही, असं निवेदन पाठवले आहे. आज नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठीच्या कुलगुरूंनी स्पष्टपणे सांगितले आहे की, असे कुठल्याही प्रकारचे निवेदन त्यांनी दिलेले नाही. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत पहिल्या दिवसापासून दुर्दैवानं राजकारण करत असून, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार लक्षात न घेता ते राजकीय व पक्षीय दृष्टीकोनातून विषयावर निर्णय करत आहेत. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राजकारण करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे.

कायद्याने विद्यापीठ स्वायत्त असताना खरं तर कुलगुरूंच्या बाबतीत मंत्र्यांनी ढवळाढवळ करणे केवळ अयोग्य नाही, तर बेकायदेशीर आहे. याच मंत्र्याच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या खर्चाच्या व निविदांच्या बाबतीत माहिती मागवली होती. कुलपती म्हणून आपण सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहात, अशा वेळेस उच्च शिक्षण मंत्र्यांनी खोटी विधान करून केवळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ केला नसून, आपल्या अधिकारांवर अतिक्रमण करून बेकायदेशीर गोष्ट केली आहे. त्यामुळे आपण आपल्या अधिकारात त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मी आपल्याकडे करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 11:18 pm

Web Title: higher education minister uday samant slam to atul bhatkhalkar bmh 90
Next Stories
1 ‘प्रमोटेड कोविड १९’ प्रकरणी कृषी विद्याापीठाकडून चौकशी
2 तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाने मृत तरुणाचा परस्पर उरकला अंत्यविधी
3 राज्यातील करोना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढताच; दिवसभरात आठ हजार रुग्णांची भर
Just Now!
X