जिल्ह्यतील औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या जया देशमुख व उपाध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा ठाकूर, तर सेनगाव नगरपंचायतीत भाजपचे अभिजित देशमुख व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कैलास देशमुख यांची बुधवारी निवड झाली.
औंढा नागनाथ व सेनगाव ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी दोन्ही ठिकाणी त्रिशंकू निकाल दिला. एकमेकांशी युती केल्याशिवाय राजकीय पक्षांसमोर पर्याय नव्हता. औंढा नागनाथ येथे भाजपचे ४, तर शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी ५, राष्ट्रवादी २ व १ अपक्ष असे नगरसेवक निवडून आले. वरिष्ठांच्या आदेशावरून अखेर येथे भाजप-शिवसेना युती झाली.
सेनगावमध्ये ३ पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन करता येत नव्हती. सुरुवातीला येथे काँग्रेस, शिवसेना व मनसे यांची युती झाली. नगरसेवक सहलीवर गेल्यापासून भाजप आमदारांनी राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांची भेट घेऊन समेट घडवून आणला. राष्ट्रवादी आणि भाजपकडे प्रत्येकी ४ नगरसेवक होते. परंतु सत्ता स्थापनेसाठी एक नगरसेवक कमी पडत असल्याने मुटकुळे यांनी सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासमवेत बठक घेऊन त्यांच्यामार्फत वरिष्ठांकडून युतीसाठी दबाव आणला.
औंढा नागनाथ येथे भाजप-शिवसेनेत एकदिलाने युती झाल्यामुळे सहलीवर गेलेले नगरसेवक बुधवारी परतले. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून जया अनिल देशमुख, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा ठाकूर यांची निवड झाली. शिवसेनेच्या देशमुख यांनी गणेश देशमुख यांचा ९ विरुद्ध ६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले, तर एका अपक्षाने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात ठाकूर यांनी १० विरुद्ध५ मतांनी काँग्रेसच्या सुमित मुळे यांचा पराभव केला.
राष्ट्रवादीचे दोघे तटस्थ राहिले, तर अपक्षाने भाजप उमेदवाराला मतदान केले. औंढय़ात युती कायम राहिली. नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचा पहिला मान शिवसेनेला, तर उपाध्यक्षपदाचा भाजपला मिळाला.
सेनगाव येथील चित्र मात्र वेगळे होते. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप प्रत्येकी चार, शिवसेना दोन, तर मनसेचे तीन उमेदवार निवडून आले.