अमरावतीमध्ये मुलीने मनाविरुद्ध जाऊन आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या पित्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम ढोकेला अटक केली आहे. ढोके हे वाशीममधील आसेगाव येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तब्बल चार महिन्यांनंतर पोलीसांना हत्येचे गूढ उकलण्यात यश आले आहे.

अमरावती जिल्ह्यात राहणारा सचिन सिमोलीया हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार ३१ मेरोजी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. सिमोलीया कुटुंबाने पाठपुरावा केल्याने पोलिसांनीही या घटनेच्या तपासाला सुरुवात केली.  सचिनने तुकाराम ढोके यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे सिमोलीया कुटुंबाने तुकाराम ढोकेवर संशय व्यक्त केला होता. बेपत्ता होण्यापूर्वी सचिनचे शेवटचे बोलणे तुकाराम ढोकेशीच झाले होते. मात्र तुकाराम ढोके पोलीस खात्यात अधिकारी दर्जावर असल्याने त्यांना थेट अटक करणे कठीण होते.  या काळात पोलिसांनी अमरावती जिल्ह्यात अज्ञात मृतदेह कुठे कुठे सापडले याचा शोध घेतला. या दरम्यान मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह ९० टक्के जळालेेल्या स्थितीत आढळल्याचे निदर्शनास आले. तसेच मृतदेहाजवळ मंगळसूत्र आणि आणखी काही दागिने आढळले होते. पण हा मृतदेह जळालेला असल्याने त्याची ओळख पटणे अशक्य होते. शेवटी पोलीसांनी मृतदेहाच्या डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. या चाचणीत तो मृतदेह सचिनचाच असल्याचे सिद्ध झाले आणि या गुन्ह्यातला मोठा पुरावा पोलीसांच्या हाती लागला.

वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी याप्रकरणावर सविस्तर चर्चा केली आणि शेवटी पोलिसांनी तुकाराम ढोकेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीत त्याने सचिनच्या हत्येची कबुली दिली आहे. आपल्या मुलीने मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न केल्याने तुकाराम ढोके नाराज होता. यातूनच त्याने जावयाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तुकाराम ढोकेंनी मुलीला आणि जावई सचिनला लग्नाच्या बहाण्याने भेटायला बोलावले. यानंतर त्यांना गाडीत बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे गळा आवळून सचिनची हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून दिला. ढोकेनी हत्येनंतर मुलीवरही दबाव टाकला होता. भीतीपोटी तिनेही या घटनेची वाच्यता केली नाही. मुलीला सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने तिला माहेरी आणले असा कांगावाही ढोकेने केला होता.  याप्रकरणी आज सकाळी पोलिसांनी ढोकेसह त्याचा मुलगा तुषार ढोके आणि भाचा प्रवीण आगलावे यालाही अटक केली आहे.