अर्जुन नलवडे, कोल्हापूर

फक्त जीव वाचव रे देवा, अशी प्रार्थना करत इमारतीच्या छतावर मदतीची वाट पाहणारे पूरग्रस्त.. आयुष्याची जमापुंजी खर्च करून उभारलेला संसार उद्ध्वस्त होताना पाहून दाटून आलेला हुंदका.. महापूर आणि माणसांची गर्दी पाहून बोटीतून उतरणाऱ्या चिमुकल्यांचे जीवघेणे रडणे, गर्भवती आणि वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावरील आर्जवी भाव.. जिवाची बाजी लावून जमेल तसे, जमेल त्या मार्गाने पूरग्रस्तांना वाचविणारे मदत आणि बचाव पथकांतील जवान, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, असे चित्र कोल्हापुरातील अनेक भागांत दिसत आहे.

पंचगंगा नदीशेजारील आंबेवाडी गाव, चिखली पराग, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गंगावेश, रमणमाळ आदी ठिकाणे पूर्णत: पाण्याखाली गेली होती. तर मध्य शहरातील जयंती नाल्यामुळे लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी, दसरा चौक, कुंभार गल्ली जलमय झाली होती. येथील लोकांना जुना बुधवार पेठ तालीम मंडळाच्या सभागृहात आणण्यात येत होते. विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्यात येत होती. पूरग्रस्तांना कपडे, अन्नधान्य, अंथरुण-पांघरुणाची मदत करण्यात स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आघाडीवर होते. शाहूपुरी आणि व्हीनस कॉर्नरमधील हॉटेल, दवाखाने, फ्लेक्सची दुकाने, फोटो स्टुडिओ, रेडियम बॅनरची दुकाने, सायबर कॅफे, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुमारे १५ फूट पाण्याखाली गेली होती. चार दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला इमारतींमध्येच अडकली होती. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्याचे काम सुरू होते. मध्य शहरातील विल्सन पुलाच्या पाण्यात ज्यांची इमारती बुडाली ते ज्येष्ठ नागरिक अस्लम मुल्ला म्हणाले की, ६० वर्षांपासून आमचे शाहूपुरीत वास्तव्य आहे. १९८९च्या पुराचा अनुभव आम्हाला होता. म्हणून आम्ही या वेळी पाण्याचा अंदाज घेऊ न घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले. मात्र, तो अंदाज चुकला आणि जवळजवळ १२ फूट पाणी घरात शिरले. घरातले सर्व साहित्य, चारचाकी आणि दुचाकी गाडय़ा पाण्याखाली गेल्या. चार दिवसांपासून घरात अडकून पडलेल्या व्यक्ती, दवाखान्यातील रुग्ण इत्यादींना पुरातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संसाराचा विचार करत शून्यात पाहत बसलेल्या ज्येष्ठ महिला सीमा कांबळे सांगू लागल्या, आयुष्यभर लोकांची धुणीभांडी करत, भांडय़ाला भांडे जोडत संसार उभा केला आणि तो डोळ्यांदेखत वाहून गेला. पैसे साठवून कष्टाने घर उभे केले होते, पण पावसात घराच्या भिंतीही ढासळल्या. दोन कपाटे, अंथरुण, टीव्ही, लेकरांचे कपडे सगळे काही वाहून गेले. फक्त अंगावरच्या कपडय़ांवर पाच दिवसांपासून रस्त्याच्या कडेला आसरा घेतला आहे.

शनिवारच्या मध्यरात्रीपासून जयंती नाल्याचे पाणी दुकानात शिरले. पाण्याची पातळी सात फूट होती. रविवार सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे हमाल, मजूर त्यांच्या गावी निघून गेले होते. पन्हाळा, शाहुवाडी गावातील हमाल असल्यामुळे पुराच्या पाण्यात तेही अडकून पडले होते. मग कुटुंबीयांना घेऊ न शक्य तितके साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. धान्यांच्या गोदामांमध्येही पाणी शिरल्याने कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस कडधान्ये, ज्वारी, बाजरी, गहू, तांदळाच्या गोण्या पाण्यात होत्या. त्यामुळे त्या कुजल्या. पाणी पूर्ण ओसरल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज येईल.

– वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष, कोल्हापूर ग्रेन र्मचट.

कुंभार गल्लीतील गणेशमूर्ती पाण्यात   

कुंभार गल्लीत गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरू होती. मूर्ती साकारण्याची लगबग होती. मात्र जयंती नाल्याला आलेल्या पुरामुळे सर्वच मूर्ती वाहून गेल्या, तर काही १०-१५ फुटांच्या गणेशमूर्ती पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होत्या. मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंभार गल्लीतील घरेही बुडाली होती. नाल्याला लागून असलेली घरे पाण्यात आहेत. काही बंगल्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरले.

मध्य शहरातील दळणवळण ठप्प

रविवारपासून बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला नव्हता. त्यामुळे हॉटेल बंद होती. बाजार पाण्याखाली होता. मुख्य मार्गावरील दुकाने बंद होती. सोमवारी आणि मंगळवारी पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होती. मात्र पेट्रोलचे टँकर अडकून पडल्याने पेट्रोल विक्रीवरही मर्यादा येत होती. ग्राहकांना १०० आणि ५० रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल पंपचालक देत नव्हते. बुधवारी-गुरुवारी मध्य शहरातील पेट्रोल पंप बंद करण्यात आले होते. ठरावीक भागांतच केएमटी (शहरी बसेस) सुरू होत्या. काही भागांत मोजक्याच रिक्षा सुरू होत्या. मात्र रिक्षाचालक तिप्पट भाडे घेऊन पुरात हात धुऊन घेत होते. वाहतूक व्यवस्था कोलमडलेली होती. त्याचबरोबर रविवारपासून नदीशेजारील भागांमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील लोक तीन दिवस अंधारात चाचपडत आहेत.

रस्त्यांची दुर्दशा

रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहन चालविणे कठीण होत होते. रस्त्यांवरील गटारांची झाकणे पाण्याच्या दबावामुळे उघडली गेल्याने जागोजागी गटारांतून पाण्याचे फवारे उडताना दिसत होते. काही ठिकाणी पाण्यामुळे गाडय़ा घसरून छोट-मोठे अपघात होत होते. मुसळधार पावसामुळे शहरातील प्राचीन मंदिराचे छत कोसळले. काही ठिकाणची मंदिरेच पाण्याखाली गेली होती. वस्त्यांमधील झाडांच्या फांद्या तुटल्या होत्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या दुचाकींवर पडल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते.