विरार : वसई-विरारमध्ये पत्नी करोनाबाधित असल्याने पेशाने डॉक्टर असलेल्या दाम्पत्यांना सोसायटीने मालकातर्फे घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता डॉक्टरांनी आपली सेवा कशी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वसई पश्चिम येथील वालीव परिसरात खासगी दवाखाना चालवणाऱ्या एका डॉक्टरच्या पत्नी या करोना रुग्णाच्या सान्निध्यात आल्याने त्यांना करोनाची बाधा झाली. तर डॉक्टरांचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. हे दाम्पत्य याच परिसरात ड्रीम व्हॅली सोसायटीत भाडय़ाने राहत आहे. करोना चाचणी अहवालाची माहिती त्यांनी राहत असलेल्या सोसायटीच्या मंडळींना दिली आणि दोघे पती पत्नी उपचारासाठी पालिकेच्या करोना केंद्रात दाखल झाले.

दाखल झाल्यानंतर सोसायटीच्या समाज माध्यम समूहावर डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी संदर्भात विविध अभिप्राय व्यक्त करण्यात आले आणि त्यांना सोसायटीत राहू देऊ नये अशी चर्चा सुरू झाली. या नंतर सोसायटीच्या शिष्टमंडळाने घर मालकाला या बाबत सांगितले आणि डॉक्टरांना घर खाली करण्यास सांगावे अशी सूचना देण्यात आली. दरम्यान, सदरची सोसायटी नोंदणीकृत नसल्याने काही रहिवासी सोसायटीचे कामकाज पाहत आहेत. त्यांच्याकडूनच दबाव वाढत आहे.

घरमालक यांनी डॉक्टरांना या संदर्भात सोसायटीच्या वतीने सूचना देत १४ दिवसांच्या आत घर खाली करा असे सांगितले. यामुळे आधीच करोनाच्या संकटाने पीडित डॉक्टर आता आपल्या डोक्यावरचे छतही जाणार या भीतीने घाबरले आहेत.

आम्ही या महामारीच्या काळात दवाखाने सुरू ठेवून रुग्ण सेवा करत होतो. करोनाची लागण आमच्या हाती नाही आहे पण यामुळे जर आम्हाला आमचे घरच खाली करावे लागणार असेल तर इतर डॉक्टर सेवा कशा प्रकारे देतील.

– पीडित डॉक्टर

मी डॉक्टरांना घर खाली करण्याच्या विरोधात आहे, पण सोसायटीतील रहिवासी माझ्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे मला असे करावे लागले, तरीसुद्धा मी सोसायटीशी बोलत आहे, लवकरच निर्णय घेतला जाईल.

– मन्सूर चव्हाण, घरमालक