“पहिली लाट ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आली, दुसरी जी आपण अनुभवतो आहोत ती युवा आणि मध्यमवयीन नागरिकांमध्ये आली. मग आता जो काही वर्ग आहे तो मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्या गेल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही. करोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) सांगितलं.

तिसऱ्या लाटेतही लहान मुलांमधील करोना कसा रोखणार? या विषयावर आज लहान मुलासांठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सशी त्यांनी संवाद साधला.  आज राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधत आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “एका गोष्टीचं मला समाधान आहे. मागील वर्षी साधरण याच दिवसांमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली होती. तेव्हा कदाचित आपल्या देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आपण लवकर पावलं उचलायला सुरूवात केली. रूग्णालयं कमी पडतील. बेड्स कमी पडतील हा विचार करून आपण जम्बो सुविधा केंद्र तयार केली. तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला. करोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्रात झाली.”

तसेच, “राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असताना व देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी लॉकडाउनचा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आणि त्यासाठी मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की,कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश जरी मिळालेलं नसलं, तरी या नियंत्रणाचं सर्व श्रेय हे डॉक्टरांना आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये वाढतोय करोना…धक्कादायक आकडेवारी आली समोर

याचबरोबर, “नागरिकांनी घाबरू नये, घाबरण्याचं कारण नाही. मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी. कारण अजुनही करोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आपली तयारी देखील सुरू आहे. सध्याच्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनसह अन्य बाबींचा तुटवडा जाणवला. भविष्यात आणखी तुटवडा जाणवू नये यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. येत्या काही दिवसांत मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचा आहे. परंतु यासाठी काही दिवस लागणार आहेत. तसेच, साधरणपणे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यावर सोपवण्यात आलेली आहे. महाविकासआघाडी सरकारची सहा कोटी नागरिकांसाठी दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकरमी घेण्याची तयारी आहे. मात्र दुर्दैवाने अजुनही लस पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण प्रक्रिया काही दिवसांसाठी स्थगित करावी लागली आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

तर, “अजुनही १८ वर्षाखालील मुलांना कोणती लस द्यायची, याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन झालेलं नाही. काही ठिकणी ट्रायल देखील सुरू आहेत. तो निर्णय जेव्हा होईल व आपल्याला केंद्राकडून काही निश्चित सूचना येतील, तेव्हा आपण ते लसीकरण देखील केल्याशिवाय राहणार नाही. तूर्त मी सर्व नागरिाकांना एक दिलासा देतोय, यामध्ये चिंता जरी असली तरी घाबरण्याचं कारण नाही. घाबरू नका आपण सज्ज आहोत. मात्र काय करावं? काय करू नये? आणि वेळेत काय करावं? याबाबत नीट मार्गदर्शन या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळाल्यानंतर सूचना व्यवस्थित पाळा.” असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

लहान मुलांमधील करोना कसा रोखावा? बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करणार मार्गदर्शन!

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून, या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. डॉ. सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.