काळी जादू, अघोरी कृत्य, मांत्रिक  उपचार असले प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात थांबावेत आणि विज्ञानाधिष्ठित समाजाची रचना व्हावी यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याला राज्य सरकारने नुकतीच संमती दिली असतानाच जादूटोणा, अघोरी कृत्ये असे प्रकार सुरूच आहेत. देवळाली गावात असा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर जादूटोणाविरोधी विधेयकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्या विधेयकानुसार गुन्हा दाखल होण्याचा राज्यातील हा दुसरा प्रकार आहे. न्यायालयाने संशयितांना १० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
देवळाली गावातील राजवाडा परिसरात भालेराव कुटुंब राहते. या कुटुंबातील प्रमुख मोगल भालेराव दुर्धर आजाराने त्रस्त होते. कुटुंबियांनी त्यांच्यावर अघोरी कृत्य, जादूटोणा, मांत्रिक उपचार करण्याची तयारी केली होती. त्यासाठी घरातच पाच फूट खोल खड्डा खणण्यात आला होता. श्रावण अमावास्येच्या दिवशी, गुरुवारी रात्री शेजारच्यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता भालेराव यांचे पुत्र विजय यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सकाळी पुन्हा घरात खणण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे संशय बळावलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस भालेराव यांच्या घरात शिरल्यावर त्यांना विचित्र प्रकार पहावयास मिळाला. सुमारे पाच फुट खोल खड्डा खणण्यात आलेला होता. गोमूत्र, लिंबू, हळद, कुंकू, अगरबत्ती, नारळ आदी वस्तू आढळल्या. तीन लहान मुलांच्या कपाळाला हळद-कुंकू लावण्यात आलेले होते. पोलिसांनी या प्रकरणी जितेश भालेराव, विजय भालेराव, सुनीता भालेराव, संगीता भालेराव या सर्वाना अटक केली.  सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या. जादूटोणाविरोधी अध्यादेशानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.