दोन दिवसापूर्वी गावी जावू देण्याच्या मागणीसाठी परप्रांतीय मजूर रस्त्यावर उतरले होते. त्याचे गुरुवारी आणखी संतप्त पडदसाद कोल्हापुरात उमटले. टाळेबंदीमुळे शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना रोजगार नसल्याने आणि खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याने ‘आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या’अशी आर्त साद घालत शेकडो परप्रांतीय मजुरांचा लोंढा पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उतरला. यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिसांची एकाच धावपळ उडाली. या मुद्दावरून राजकीय टीकाटिपणी रंगली.

देशभरात करोनाच्या फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगधंदे बंद आहेत. हजारो कामगारांचा रोजगार गेला आहे. वेतन मिळत नसल्याने त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न  निर्माण झाला   आहे.  त्यामुळे लवकरात लवकर आपल्या मूळ गावी परतण्याची त्यांना घाई झाली  आहे. यातून मंगळवारी इचलकरंजी जवळ कामगारांचा आक्रोश पाहायला मिळाला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज कोल्हापुरात पाहायला मिळाली. अखेर शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुरांनाचा संयम सुटला आणि त्यांनी महामार्ग रोखला.

शेकडो कामगारांच्या झुंडी रस्त्यावरून भर दुपारी तळपत्या उन्हात शिरोली येथून कोल्हापूरकडे निघाल्या  होत्या. मिळेल ते संसारिक साहित्य घेवून निघणाऱ्या या कामगारांनी रेल्वेने गावाकडे जाण्याची सोय करावी, अशी मागणी केली होती. या कामगारांना कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या अगोदर तावडे हॉटेल येथे रोखण्यात आले . त्यांची गावी जाण्याची सोय करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तरीही त्यांचा आजच गावी सोडण्याची व्यवस्था करा, असा रेटा कायम होता. कशीबशी समजूत घातल्यावर त्यांचा राग शमला.