राज्य सरकारच्या बांधकाम क्षेत्रासंबंधीच्या धोरणासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. “बांधकाम क्षेत्रात मागणी वाढविण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

करोना काळात आजारी पडलेल्या गृह बांधणी क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी राज्य सरकारने दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीकडून शिफारशी मागवण्यात आल्या होत्या. “या समितीने केलेल्या शिफारशींचा प्रत्यक्ष काय परिणाम होईल, हे विचारात न घेता निवडक पद्धतीने त्याची अमलबजावणी केली जात आहे” असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

“मी ठराविक उद्देशाने हे पत्र इंग्रजी भाषेत लिहित आहे. कल्पना दिल्यानंतरही तुम्ही सुधारणात्मक निर्णय घेतले नाही, तर नाईलाजाने मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेन” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राद्वारे दिला आहे. “तुम्ही कधीही या संदर्भात माझ्याकडून माहिती मागवू शकता” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

“मूठभर खाजगी लोकांना फायदा पोहोचवणारा आणि राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.