भाजपाने शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला असतानाच नारायण राणे यांनी भाजपाला इशारा दिला आहे. भाजपा- शिवसेनेची युती झाली तर मी युतीत नसेन. मी युतीतून बाहेर पडणार, असा इशाराच नारायण राणेंनी दिला आहे. राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात भाजपा, शिवसेना व सद्य राजकीय स्थितीबाबत भाष्य केले. शिवसेना- भाजपा युतीविषयी ते म्हणाले, भाजपाच्या मंत्रिमंडळात मी गेलो तर शिवसेना सत्ता सोडणार होती. त्यांना इतकं असेल तर ते  युतीत आले तर मी देखील युतीत राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेना माझा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने कोणाशी युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे. पक्ष स्वबळावर येणार नाही हे जाणवल्यास युती केली जाते. पण राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.  राहुल गांधी मोठे होतायेत. पण त्यासाठी वेळ लागेल, असेही ते म्हणालेत.

भाजपाकडून मला २०१४ पासून विचारणा होत होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास करत असताना त्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यांनी मला राज्यात मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. २०१९ पर्यंत महाराष्ट्रात राहण्याचा आणि त्यानंतर दिल्लीत जाण्याचा निर्णय मी स्वतःच घेतला होता. पण भाजपासमोर काही अडचणी आल्या. सत्तेतून बाहेर जाण्याची शंका निर्माण झाल्याने भाजपाने मला राज्यसभेत खासदारकीची ऑफर दिली. मी ती ऑफर नाकारली होती. पण पक्षाध्यक्ष अमित शहांनी माझ्याशी चर्चा केली. तुम्हाला दिल्लीत कायमस्वरुपी ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आणि मग मी त्यासाठी तयार झालो, असे त्यांनी सांगितले. ही एक तडजोड होती. पण राज्यात भाजपाची सत्ता जाऊ दिली नसती, असा दावाही त्यांनी केला.

माझा पक्ष भाजपात विलिन करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मी भाजपाचा सभासद झालेलो नाही. पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेत जाता येते, असेही त्यांनी सांगितले. मी मुळात हिंदुत्ववादी विचारांचा आहे. काँग्रेसमध्ये एक तडजोड म्हणून गेलो होतो. उद्धव ठाकरेंमुळे मी सेक्यूलर झालो. पण तिथे मी रमलो नाही. म्हणूनच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. माझे अनेक मित्र भाजपात आहे. त्यामुळे भाजपा मला जवळचा पक्ष वाटला, असे त्यांनी सांगितले.

मला आयकर किंवा ईडीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. मी राजकारणासह व्यवसायातही सक्रीय आहे. माझे दोन नंबरचे धंदे नाही. मी हॉटेल व्यवसायात सक्रीय आहे, असे त्यांनी नमूद केले.