16 December 2019

News Flash

पक्षांतर की पक्षनिष्ठा? अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

मी खूप व्यथित आहे असे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्टवरुन त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. आता या संपूर्ण विषयावर स्वत: पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. मी खूप व्यथित आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपण भाजपा सोडणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

पद मिळवण्यासाठी मी दबाट टाकतेय हा आरोपही संपूर्णपणे चुकीचा आहे. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

मंगळवारी भाजपाचे नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे दरवर्षी अशी पोस्ट टाकतात. पण, यावेळी त्यांच्या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपातील काही नेते बंडाचे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर भाजपाचे अनेक बडे नेते संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन “पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,” असा खुलासा करावा लागला.

First Published on December 3, 2019 5:45 pm

Web Title: i will not left bjp pankaja munde dmp 82
Just Now!
X