मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा विचार करावा ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी लाथ मारली तर मला दुसरं घर शोधावंच लागणार अशी प्रतिक्रिया भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. आज दुपारी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मध्यतंरी मी भ्रमिष्ट झालो होतो, भाजपाने माझा वापर केला असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाकडून उत्सुक आहे. मात्र मला तिकिट मिळालं नाही तर मला इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत असाही इशारा संजय काकडे यांनी दिला.

संजय काकडे यांनी म्हटले आहे की माझ्यावर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अन्यायच केला आहे. मला कायम या दोघांकडून डावलण्यात आलं आहे. आता मुख्यमंत्री या दोघांचं ऐकून काही निर्णय घेणार असतील तर मला इतर पर्याय शोधावे लागतील. मी आज अजित पवारांना भेटलो, पुण्यात त्यांचं राजकीय वजन जास्त आहे हे मला ठाऊक आहे. मुख्यमंत्र्यांनी डावललं तर मात्र मला माझा मार्ग मोकळा आहे असे काकडे यांनी म्हटले आहे. मला कार्यकर्त्यांकडून किंवा नगरसेवकांकडूनही चांगली वागणूक मिळत नाही. माझ्या कार्यकर्त्यांनाही कोणती पदं देण्यात आलेली नाही. त्यांनाही या बापट आणि दानवेंकडून चुकीची वागणूक दिली जाते आहे. मी यावर शांत राहिलो आहे. मात्र मला लोकसभेसाठी डावललं गेलं तर इतर पर्याय मोकळे आहेत असेही काकडे यांनी म्हटले आहे.

मी येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांच्या कानावर मला न पटणाऱ्या गोष्टी घालणार आहे त्यानंतर माझा निर्णय काय असेल ते मी ठरवेन असंही काकडे म्हटले आहेत. त्यामुळे आता संजय काकडे यांची समजूत घालण्यात मुख्यमंत्री यशस्वी होणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.