३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानास दिला आहे. तसेच, त्यावेळी आम्ही शिर्डी संस्थानास तालिबानी पुरस्कार देऊन सत्कार करू व त्यांच्या निर्णयाचा याचा निषेध करू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना आज सकाळी पुण्याहून शिर्डीकडे जाताना, नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ पोलिसांनी रोखलं आणि ताब्यात घेतलं होतं. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली होती.

यानंतर दुपारी त्यांची सुटका करण्यात आल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की, ”तुमच्या जीविताला धोका असल्याने शिर्डीला तुम्हाला जाता येणार नाही, असे सांगून या आम्हाला आता सोडण्यात आलेलं आहे. परंतु आम्हाला अटक केल्यानंतर आम्हाला असं कळालं की, तिकडं जल्लोष करण्यात आला. जिथं साईबाबांनी सबका मालिक एक आहे असं सांगितलं. तिथं महिलांना अटक झाल्यावर जर कुणी जल्लोष करत असेल, तर मला असं वाटतं की महिलांचा अपमान करणारी मानसिकता अजूनही शिर्डीत आहे किंवा विरोध करणाऱ्यांमध्ये आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आमचं आंदोलन आहे.”

तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, शिर्डीला जाण्यापासून रोखलं

तसेच, ”या फलकाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न संस्थानाकडून केला गेलेला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. आम्हाला असंही कळालं की तो बोर्ड आमच्या हाताला लागू नये म्हणून उंचावर घेण्यात आला आहे. परंतु उंचावर घेण्यापेक्षा जर तो काढून टाकला असता तर निश्चितच संस्थानाचं आम्ही अभिनंदन केलं असतं. परंतु आता जरी पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं असेल, की शिर्डीला तुम्ही गेलात तर तुमच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्यालाच जावं लागेल. त्यामुळे आम्हाला आता पुण्याला जावं लागत आहे. मात्र पुन्हा एकदा मी साई संस्थानला विनंती करते की, ३१ डिसेंबरपर्यंत जर फलक हटवला नाहीतर आम्हाला पुन्हा तिथं यावं लागेल व फलक हटवावा लागेल. त्यामुळे साई संस्थानाची भूमिका पूर्णपणे अयोग्य आहे. आम्ही जेव्हा ३१ डिसेंबरनंतर आंदोलन करू, तेव्हा संस्थानाने जर फलक काढला नाहीतर, आम्ही संस्थनाचा तालिबानी पुरस्कर देऊन सत्कार करणार आहोत व निषेध करणार आहोत.” असंही यावेळी तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

काय आहे ड्रेसकोड फलक प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.