विजय राऊत

अर्धवट जळालेल्या औषधांमुळे धुंदलवाडी परिसरात उग्र दुर्गंधी

मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली करत कित्येक किलो औषधे डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी परिसरात फेकून देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही ठिकाणी नुसती टाकून दिलेली तर काही ठिकाणी अर्धवट जळलेली औषधे दिसतात. औषधांमधील रासायनिक घटक जळल्यामुळे या परिसरात उग्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून औषधांची अशी विल्हेवाट लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

परिसरात अनेक खोक्यांमधून कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी टाकण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. या खोक्यांमध्ये नेमका कसला कचरा आहे याची पाहणी केली असता मुदत उलटून गेलेली औषधे असल्याचे लक्षात आले. हा औषधांचा कचरा जाळला जात  असल्याचेही दिसून आले आहे.

कचऱ्यात काय?

लहान बाटल्यांमध्ये उपलब्ध असलेली द्रवरूप औषधे, उच्च दर्जाची प्रतिजैविके कचऱ्यामध्ये आहे. यापैकी बऱ्याच औषधांची मुदत २०१४ आहे. मानवी आजारांवर दिल्या जाणाऱ्या औषधांबरोबरच प्राण्यांच्या काही औषधांचाही या कचऱ्यामध्ये समावेश आहे.

धुंदलवाडी परिसरात अशी औषधे फेकून दिल्याचे समोर आले आहे. याबाबतीत चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच त्या ठिकाणी टाकलेली औषधे लवकरात लवकर त्या ठिकाणावरून उचलण्यात येतील.

– राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू