पाकिस्तानसह देशातील अन्य भागातून कांद्याची वाढलेली आवक आणि दुसरीकडे स्थानिक बाजारात येणारा निकृष्ट दर्जाचा माल याचा परिणाम सोमवारी लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याचा भाव प्रति क्विंटलला ९०० तर नव्या पोळ कांद्याचे भाव ७०० रूपयांनी घसरण्यात झाला. पावसामुळे खराब झालेला, अतिशय लहान आकारातील आणि ओलसर कांदा बाजारात येत असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीत निरुत्साह दाखवत भाव खाली आणले. राज्यात अहमदनगर व धुळे जिल्ह्यातून कांद्याची आवक वाढली आहे.
देशातील प्रमुख महानगरांमध्ये आणि राज्यातील अनेक शहरांत कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव ७० ते ९० रूपयांच्या घरात धडकल्याने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. तेजीच्या वातावरणाचा लाभ शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याचे उघड झाले. नवरात्रौत्सवात झालेल्या अतिवृष्टीमुळे नव्या कांद्याची आवक घटली आहे. घाऊक बाजार व्यापाऱ्यांच्या मर्जीनुसार चालतो. तेजीच्या वातावरणाची बरीच चर्चा होत असली तरी वास्तवात अधिकतम भाव मिळणारा कांदा अतिशय अल्प प्रमाणात खरेदी केला जातो. उर्वरित बहुतेक मालाची किमान पातळीच्या भावाने किंमत उत्पादकाच्या हाती पडते. परंतु, अधिकतम भावाचा गवगवा होत असल्याने पुढे व्यापारी खरेदी केलेला सर्व माल महागडय़ा दराने ग्राहकांच्या माथी मारतात. या तेजीच्या वातावरणाला सोमवारी काहिसा लगाम लागला खरा, परंतु, त्याची कारणे वेगळी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. राजस्थानातील अल्वर या ठिकाणी सोमवारी आठ हजार क्विंटल आवक झाली. या शिवाय पाकिस्तानमधून मोठय़ा प्रमाणात कांदा येत आहे. राज्यातील अहमदनगर व धुळे जिल्ह्यात या दिवशी कांद्याची आवक वाढली. या सर्वाचा परिणाम नाशिकमधील कांद्याचे दर घसरण्यात झाल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दिवाळीनिमित्त बाजार पुढील पाच ते सहा दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळेल या आशेने खळ्यात जसा आहे, तसा कांदा बाजारात आणण्यावर भर दिला. पावसाच्या कचाटय़ात सापडलेला हा कांदा आकाराने अतिशय लहान असून ओलसर आहे. दुसरीकडे साठवणूक केलेला उन्हाळ कांद्याचाही दर्जा घसरलेला आहे. यामुळे सोमवारी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटलला किमान १९०० ते कमाल ५१०० तर नव्या पोळ कांद्याला १७०० ते ४२०० असा भाव मिळाला. उन्हाळ कांद्याचा सरासरी भाव ४७०० रूपये तर पोळ कांद्याचा ३३०० रूपये आहे. शुक्रवारच्या तुलनेत हे भाव अनुक्रमे प्रति क्विंटलला ९०० व ७०० रूपयांनी कमी झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.