गुजरातमधील बडोदा येथे यंदाचे ९१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु असून आज संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. संमेलनाची सांगता व्हायला अवघे काही तासच शिल्लक असताना येथील पुस्तक स्टॉलधारकांनी पुस्तक विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला असून आयोजकांविरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नगरीत अर्थात बडोद्यात यंदाचे साहित्य संमेलन होत असल्याने त्याची सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्ष संमेलन सुरु झाल्यानंतर यातील आयोजकांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. दरवर्षी संमेलनात पुस्तक विक्रीचे विक्रम होत असतात. मात्र, यंदाच्या साहित्य संमेलनात बडोद्यात मराठी जनांची संख्या लाखांच्या घरात असताना संमेलनाला बऱ्यापैकी गर्दी असतानाही लोकांनी पुस्तकांच्या स्टॉलकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी स्टॉलधारकांनी आयोजकांना दोषी धरले असून योग्य जाहीरात न केल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर, बडोद्यात तापमान वाढत असताना आयोजक स्टॉलधारकांसह साहित्यप्रेमींसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी साधा पंखा, थंड पाण्याचीही येथे सोय नसल्याचे स्टॉल धारकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संमेलनाच्या सांगतेसाठी काही तासच शिल्लक राहिले असताना पुस्तक स्टॉल धारकांनी ग्रंथविक्री बंद करुन धऱणे आंदोलन सुरु केल्याने महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोंधळाबाबत आयोजकांचे मत अद्याप कळू शकलेले नाही.