राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमूळे शेतीचे नुकसान होत आहे. या कामांमूळे एकही शेतकरी जर शेती करण्यास वंचित राहिला तर त्याची नुकसान भरपाई महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आज (रविवार) दिला.

पालकमंत्री केदार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची देवूळगाव, हमदापूर येथे भेट देवून पाहणी केली. यावेळी विविध त्रूटी दिसून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. महामार्ग प्राधिकरणातर्फे  होत असलेल्या रस्त्याची उंची शेतापासून पाच फुटापेक्षा जास्त आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेले रस्ते बंद झाल्याचे दिसत आहे.  तर, कंत्राटदाराने खराब केलेले रस्ते दुरूस्त करून द्यावेत, अशी सूचना देखील केदार यांनी यावेळी केली.

सांडपाणी वाहून जाण्यासाठी काय व्यवस्था आहे? गावाच्या रस्त्यावरील काढलेले पथदिवे केव्हा लावणार? अपघातप्रवण स्थळं किती आहेत, त्यावर काय उपाय झाले, असे प्रश्न उपस्थित करत त्याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२० पर्यत पूर्ण करण्याचे आदेश होते. मात्र गत दीड वर्षात केवळ दहा टक्केच काम कंत्राटदाराने करूनही त्यांना मुदतवाढ कशी मिळाली, असा सवाल उपस्थित करण्यात आला.  तसेच, या कामासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराने काय अहवाल पाठविला याची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्ता दिलेल्या मुदतीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना केली. तसेच, बुटीबोरी‑तुळजापूर महामार्गावरील प्रवेशद्वार गांधी जिल्ह्याला शोभेल अशा पध्दतीने करण्याची सूचनाही त्यांनी केली.