जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव, देशभरासह राज्यात अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले करोना योद्धे देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. राज्यात मागील चोवीस तासांत 51 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

मागील चोवीस तासांत राज्यभरात 51 पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर, आता राज्यातील करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 809 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 1 हजार 113 जण, उपचारानंतर बरे झालेले 678 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 18 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

करोना विषाणूच्या या संकट काळात पोलीस कर्मचारी करोनाशी मुकाबला करण्याऱ्या पहिल्या फळीतील योद्धे आहेत. ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन कर्तव्य तर बजावतातच शिवाय, सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या प्रतिबंधीत क्षेत्रातही ते दिवसरात्र तैनात आहेत. परिणामी ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याने पोलिसांनाही मोठ्या प्रमाणावर करोनाची लागण झाल्याचे दिसत आहे.