गडचिरोलीत बुधवारच्या घटनेत एक जवान शहीद तर २३ जखमी; ५० ते ६० नक्षल्यांची सुरक्षादलाबरोबर दीड तास चकमक

कोपर्सी व पुलनारच्या जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करून सी-६०चे जवान दोन भूसुरुंगरोधक वाहनांनी भामरागडच्या दिशेने परत येत असताना नक्षलवाद्यांनी नेमका डाव साधला आणि सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हेमलकसा-कारमपल्ली गावादरम्यानच्या रस्त्यावर पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा शक्तिशाली स्फोट घडवून आणल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात सुरेश लिंगा तेलामी (२७) हा पोलीस जवान शहीद झाला तर एका उपनिरीक्षकासह २३ जवान जखमी झाले.

छत्तीसगडमधील सुकमा येथील नक्षली हल्ल्यात २६ जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर या जिल्हय़ातील नक्षली दलममध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. त्यामुळे येथे पुन्हा नक्षलवाद्यांचा हिंसाचार भडकण्याची शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी भामरागड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील मौजा कोपर्शी व पुलनार जंगल परिसरात सी-६० पथक व सीआरपीएफचे जवान विशेष अभियान राबवीत होते. यावेळी अचानक नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक उडाली. नक्षलवादी गोळीबार करीत असल्याचे बघून सी-६० पथकानेही आत्मसंरक्षणार्थ नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. नक्षलवाद्यांची संख्या अंदाजे ५० ते ६०च्या घरात असल्याने जवळपास एक ते दीड तास ही चकमक चालली. तीन जवान जखमी झाल्याने सी-६० पथक अधिक आक्रमकपणे नक्षलवाद्यांसमोर गेले. तोवर नक्षलवादी जंगलाचा आधार घेऊन पसार झाले होते. नक्षलवाद्यांची संख्या मोठी असल्याचे बघून अहेरीच्या प्राणहिता व भामरागड येथून अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली. जवळपास ४० जवान दोन भूसुरुंगरोधक वाहनांनी कोपर्सीच्या जंगलात दाखल झाले. दरम्यान, नक्षलवाद्यांना सी-६० पथक ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने परत जाणार असल्याची माहिती होती. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या एका दलमने हेमलकसा-कारमपल्ली गावादरम्यानच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात भूसुरुंग पेरून ठेवले होते. नक्षलवाद्यांशी दोन हात करून एका बेसावध क्षणी सी-६० जवान भामरागड येथे परत येत असतानाच सायंकाळी ७.३० च्या सुमारास हेमलकसापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर कियर गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट घडवून आणला. पहिले वाहन समोर निघून गेले तर दुसरे वाहन स्फोटाचे लक्ष्य ठरले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, वाहन तीन ते चार फूट उंच उडाले आणि तीनदा उलटले. रात्रीची वेळ असल्याने सर्वत्र काळोख पसरलेला होता. त्यात समोर तथा आजूबाजूला काहीच दिसत नव्हते.  सी-६० जवान एकमेकांची नावे घेत आधार देत होते. या स्फोटानंतर जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. समोर गेलेल्या भूसुरुगरोधक वाहनातील सी-६० जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवादी तिथून पळून गेले. यानंतर या नक्षली हल्ल्याची माहिती भामरागड व अहेरी, प्राणहिता मुख्यालयात देण्यात आली. माहिती मिळताच अतिशय सावध पावित्रा घेत सी-६० व सीआरपीएफच्या आणखी काही तुकडय़ा घटनास्थळी पोहचल्या. यावेळी जखमी अवस्थेतील जवानांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तात्काळ भामरागड येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे गंभीर जखमींवर उपचार केल्यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असतानाच या हल्ल्यात अतिशय गंभीर जखमी झालेल्या सुरेश लिंगा तेलामी या जवानाला वीरमरण आले. पोलीस अधीक्षक रात्री उशिरापर्यंत भामरागड पोलीस तथा ग्रामीण रुग्णालयाच्या संपर्कात होते. त्यांनी तात्काळ हेलिकॉप्टरची व्यवस्था करून जवानांना रायपूर व नागपूर येथे हलविले.

हल्ल्यातील जखमी

नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षक दीपक मांडवलकर, प्रकाश कन्नाके, टिल्लू करंगामी, प्रीतम बारसागडे, जितेंद्र कोरेट, सावन मट्टामी, गजानन पानेम, मनोहर पेंदाम, चिन्ना कररंगामी, आयतू पोद्दाडी, सचिन आडे, रैनू तिम्मा, बिरजू धुर्वा, अतुल येग्लोपवार, केशव परसे, नामदेव बोगामी, विद्युत दहादुल्ला, सतीश कुशमहाका, भास्कर बनकर, सी ६० पथकाचे कमांडर विसू गोटा व मनोहर महाका हे जखमी झाले आहेत. यातील पाच जवानांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

नक्षली हल्ल्यानंतर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कनकरत्नम यांनी आज तात्काळ भामरागड येथे येवून ग्रामीण रूग्णालयात जखमी जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमी जवानांशी संवाद साधून त्यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला. तसेच कनकरत्नम यांनी भूसुरूंगस्फोट झालेल्या घटनास्थळाला भेट देवून नेमका हल्ला कसा झाला याचीही माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांचे सोबत सीआरपीएफचे महासंचालक राजकुमार, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप गावीत होते.

कोपर्सी व पुरनारच्या जंगलात पोलिसांशी चकमक सुरू होती तेव्हा किमान शंभर नक्षलवादी होते अशी माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांची संख्या अधिक असल्यामुळेच तीन पोलीस जवान जखमी झाले. नक्षलवाद्यांची संख्या अधिक असली तरी त्यांच्याजवळ त्या प्रमाणात शस्त्रसाठा नव्हता. त्यामुळे नक्षलवादी पोलिसांना प्रत्युत्तर देण्याऐवजी जंगलात पळून गेले अशीही माहिती आहे.

सूरजागड लोहखनिज उत्खननामुळे नक्षलवाद्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. सुकमा येथील घटनेनंतर लॉयड मेटल्स कंपनीने लोहखनिज उत्खनन तात्पुरते बंद केले असले, तरी हे काम तातडीने थांबवण्यात यावे अशी मागणी नक्षलवाद्यांनी अनेकदा केली आहे. या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीची संपूर्ण सूत्रे नक्षलवादी कमांडर साईनाथकडे देण्यात आली. तेव्हापासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. चकमकी, हत्या, मारहाण प्रकरणातही वाढ झालेली आहे.

देशद्रोह्य़ांविरोधात लढण्यासाठी सुरेश तेलामी पोलीस दलात

या हल्ल्यात शहीद झालेला सुरेश लिंगा तेलामी हा अवघ्या २७ वर्षीय जवान भामरागड तालुक्यातील कृष्णार या गावचा रहिवासी आहे. नक्षलवादी हे देशद्रोही आहेत असे म्हणत तो पोलीस दलात भरती झाला होता. तेव्हापासून तो याच भागात कार्यरत होता. नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या अनेक चकमकीत त्याने भाग घेतला होता. नक्षलविरोधी अभियानात तो हिरिरीने सहभागी व्हायचा. त्याच्या मागे  वृद्ध आई-वडील, पत्नी आणि अवघ्या १५ महिन्यांचा मुलगा आहे.