‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या विरोधात राज्यात सर्वत्र काँग्रेसच्यावतीने निषेध नोंदवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निषेध करूनही दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा वादग्रस्त चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झााला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी काँग्रेसकडून चित्रपटाचा शो बंद पाडून चित्रपट आणि मधुर भांडारकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  ठाण्यातील कोरम मॉलच्या बॉक्स ऑफिसमध्ये जावून काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडला. तर दुसरीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्येही ‘इंदू सरकार’विरोधात निषेध नोंदवण्यात आला. कल्याणामध्ये आयनॉक्स थिएटरमधील शो बंद पाडण्यात आला.

भारताच्या आयर्न लेडी अशी ओळख असणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि  युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय गांधी यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आहे, असा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी  ‘मधुर भांडारकर हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली.  ठाण्यातील कोरम मॉलमधील चित्रपटाचा शो बंद पाडला. राज्यातच नव्हे तर देशभरातून या चित्रपटाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर चित्रीत करण्यात आलेले चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चित्रपट दाखवण्यात आले. पण ‘इंदू सरकार’ हा चित्रपट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना न दाखवता प्रदर्शित केल्याचा आरोप आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केला.  यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १५ काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुण्यात देखील या चित्रपटाच्या विरोधात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. डेक्कन येथे राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे पोस्टर हातात घेऊन  गांधीगिरी मार्गाने या चित्रपटाचा निषेध नोंदवला.  या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी १५ दिवसांपूर्वी  मधुर भांडारकर पुण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले होते.

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही विरोध
‘इंदू सरकार’ चित्रपटाला नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तीव्र विरोध करण्यात आला. याठिकाणी चित्रपटाचे पोस्टर्स फाडून दिग्दर्शकाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकमध्ये काँग्रेस शहर अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, नगरसेविका हेमलता पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी काही आदोलकांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. जळगाव शहरातील काही चित्रपट गृहामधील चित्रपटाचे शो यावेळी बंद पाडण्यात आले.