कृषीक्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मितीत वाढ होते आणि त्यायोगे अर्थव्यवस्थेची प्रगती होते. त्यामुळे कृषीक्षेत्राच्या वाढीसाठी उद्योगक्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. केंद्रीय कृषी मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघ आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या राष्ट्रीय ‘कृषी वसंत’ या प्रदर्शनाचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायण अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या (सीआयसीआर) परिसरात १३ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
शेतक ऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय ‘कृषी वसंत’ प्रदर्शन आयोजिण्यात आले आहे. यामुळे कृषीक्षेत्राला प्रचंड चालना मिळणार असून उद्योग व कृषीक्षेत्राने हातात हात घालून काम करावे, अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली. कृषीक्षेत्रात १ टक्का वाढ झाली, तर रोजगार निर्मिती २ ते ३ पटींनी वाढते. यातून खेडय़ातील लोकांचे जीवनमान उंचावते. त्यासाठी उद्योगक्षेत्र व कृषीक्षेत्र यांच्या आणखी निकटच्या संवादाची गरज आहे. संशोधन क्षेत्रात गुंतवणूक, शेतीविषयक ज्ञान अद्ययावत करणे, नुकसान कमी करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान यासाठी उद्योगक्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय अर्थव्यवस्था वर्धीष्णू आहे. मधल्या काळात ती काहीशी रेंगाळली होती तरी गेल्या १० वर्षांत तिचा विकासदर वाढला आहे, याचा मुखर्जी यांनी त्यांच्या १३ मिनिटांच्या भाषणात उल्लेख केला.

पवारांची मुक्त स्तुती
गेल्या काही वर्षांत देशाच्या कृषीक्षेत्राची प्रचंड प्रगती आणि विकास झाला असून त्याचे मोठे श्रेय गेली १० वर्षे कृषी मंत्रालय सांभाळणारे शरद पवार यांना आहे. जवळजवळ दशकभर भारत शेतमालाचा आयातदार होता. आपले विदेशी चलन अन्न, खते आणि इंधन यांच्यासाठी खर्ची पडत होते. मात्र, आज किमान कृषीक्षेत्रासाठी विदेशी चलन खर्च करावे लागण्याची परिस्थती नाही. आज आपण केवळ आपल्या गरजेइतकेच शेतमालाचे उत्पादन करत नाही, तर निर्यातही करतो. देशातील १२५ कोटी लोकांची गरज भागवेल इतके धान्याचे उत्पादन होते, असे राष्ट्रपतींनी अभिमानाने सांगितले.