राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीची माहिती गुप्त का ठेवण्यात आली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केला आहे. सरकार जर या प्रकरणी स्पष्टीकरण देणारच नसेल तर आरोप होणारच त्यामुळेच राफेल विमान खरेदीची माहिती संसदेत देण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पहिला विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राफेल प्रकरणी सरकारवर विरोधकांकडून आरोप होत आहेत, या आरोपांवर सरकार स्पष्टीकरण देणार नसेल तर आरोप होणारच. त्यामुळे राफेल विमाने खरेदी व्यवहाराची माहिती संसदेत देण्यात यावी.

सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, राज्यात दुष्काळाचे संकट, शिवार कोरडी पडली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, केवळ कायद्याची भाषा करु नका. प्रत्यक्ष हमीभावाचा कायदा करा तुम्हाला कोणी अडवलयं. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी नवा विक्रम केल्याचेही यावेळी ते म्हणाले.