लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : लोणार सरोवरातील पाण्याचा रंग लालसर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गठीत समितीने १७ जून रोजी सरोवराला भेट दिली. समितीने काही निरीक्षण नोंदवून घेतले. दरम्यान, प्रशासनानेही लोणार सरोवरासंदर्भात गुरुवारी आढावा घेतला.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील एक आश्चार्य म्हणून ओळखले जाते. हे जागतिक दर्जाचे बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे. निळे व हिरवे दिसणारे सरोवरातील पाणी गत काही दिवसांपासून लालसर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुतूहल निर्माण झाले असून, आश्चार्य व्यक्त होत आहे. या बदलावर विविध संस्थांकडून संशोधन व अभ्यास करण्यात येत आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार १५ जून रोजी एक समिती गठीत करण्यात आली. या समितीने १७ जून रोजी लोणार सरोवराची पाहणी करून खंडपीठाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे प्रशासनाकडून पालन झाले अथवा नाही, याच्या नोंदी घेतल्या. समितीने पाण्याची पाहणी केली. दैत्यसुदन मंदिर, लोणार सरोवर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणाला भेट दिली. समितीने काही महत्त्वपूर्ण बाबीही टिपल्या असल्याचे प्रतिवादी पक्षाचे वकिल अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांनीही गुरुवारी लोणार सरोवराचा सविस्तर आढावा घेतला.