११ गुन्हे उघडकीस; नऊ  लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घरफोडय़ांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पथकाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यचे अभिलेख पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान १५ ऑक्टोबर रोजी पुसद शहरातील शिवाजीनगर व श्रीनगर भागात अवघ्या चार  तासामध्ये पाच बंद घरे फोडली होती. त्यामुळे अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यतील मेहकर तालुक्यातील असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने चार ते पाच दिवसांपासून वेशांतर करून मेहकर येथे तळ ठोकला. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून गोपनीय माहितीच्या आधारे टोळीचा प्रमुख किशोर वायाळ, (रा. मेरा. ता. मेहकर, जि. बुलढाणा), आकाश प्रकाश पवार व राजू इंगळे (रा. बऱ्हाई ता. मेहकर जि. बुलढाणा) अशा तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यतील पुसद, महागाव, उमरखेड हद्दीत ११ ठिकाणी घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडून गुन्ह्यत वापरलेली एक कार, दोन मोटारसायकल, ९७ ग्रॅम सोने व ५५० ग्राम चांदी असा एकूण आठ लक्ष ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. किशोर वायाळ याच्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यात अंदाजे दीडशेवर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पुसद शहर पोलीस ठाणे येथील दिवसा घरफोडीचे आठ गुन्हे, महागाव, वसंतनगर व उमरखेड येथील प्रत्येकी एक असे घरफोडीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.