News Flash

राष्ट्रवादीच्या ‘जंबो’ कार्यकारिणीत महिलांना नगण्य स्थान

केवळ आठ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश

( प्रतिकात्मक छायाचित्र )

केवळ आठ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश, प्रादेशिक असमतोलही उघड

महिला सबलीकरण, संधीच्या गप्पा मारताना प्रत्यक्ष संघटनेच्या कामात संधी देताना मात्र दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव सध्या राष्ट्रावादी काँग्रेसमधील महिला कार्यकर्त्यांना येत आहे. पक्षाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ‘जंबो’ कार्यकारिणीत महिलांना अगदीच नगण्य स्थान मिळाले आहे. तब्बल ११५ सदस्यांच्या या रचनेत केवळ ८ महिलांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार करताना, प्रदेशाध्यक्ष जयंत राजारामबापू पाटील यांनी आधीच्या ९१ जणांमध्ये आणखी २३ कार्यकर्त्यांची भर टाकली.

पण ही अवाढव्य कार्यकारिणी जाहीर करताना त्यात महिलांना अत्यंत अल्प स्थान देण्यात आले आहे. खरेतर एरवी महिलांच्या सन्मानाविषयी सतत बोलणाऱ्या नेत्यांचा हा पक्ष. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची महिलांच्या सन्मानाविषयीची भूमिकादेखील व्यापक स्वरूपाची आहे. असे असताना प्रदेशाध्यक्षांच्या नव्या कार्यकारिणीत केवळ आठ महिला असल्याचे दिसून येते आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसमधून देखील कोणालाही बढती दिली नसल्याचे दिसत आहे.

प्रादेशिक असमतोल

दरम्यान, ही कार्यकरिणी जाहीर होताच त्यातून प्रादेशिक असमतोलदेखील उघड झाला होता. ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेश कार्यकारिणीत मराठवाडा नगण्य या मथळय़ाखाली दोन दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या पक्षातील कार्यकर्त्यांनी नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्षांनी बीड जिल्ह्यतून माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्यासह माजी आमदार अमरसिंह पंडित यांना आपल्या ‘टीम’मध्ये घेतले. उस्मानाबाद जिल्ह्यतून पद्मसिंह पाटील यांचे समर्थक मसूद शेख इस्माईल यांची सरचिटणीसपदी वर्णी लावण्यात आली आहे.

किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षांपासून ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात असला तरी या मागास-आदिवासी भागातून एकाचीही प्रदेश कार्यकारिणीत वर्णी लागली नाही. अशीच गत बापूसाहेब गोरठेकर यांच्या नायगाव मतदारसंघाची झाली असून जयंत पाटील यांनी परभणी जिल्ह्यला पुन्हा ठेंगा दाखवला. या जिल्ह्यत पक्षाचे दोन विधान परिषद सदस्य आहेत, पण माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह कोणाचाही प्रदेश कार्यकारिणीत समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

समीर भुजबळांनाही डावलले

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांना वेगवेगळय़ा पदांवर सामावून घेताना माजी खासदार समीर भुजबळ यांना मात्र डावलण्यात आले आहे. पक्षाध्यक्षांचे निकटवर्ती, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या एकाही समर्थकाला कार्यकारिणीत घेण्यात आले नाही. या नव्या कार्यकारिणीसंदर्भात मराठवाडय़ातील डॉ. पद्मसिंह पाटील, कमलकिशोर कदम आदी ज्येष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

आठ महिलांना स्थान

नव्या कार्यकारिणीत उषाताई दराडे (बीड), विद्याताई चव्हाण (मुंबई), वसुधाताई देशमुख (अमरावती), डॉ. भारती पवार (नाशिक), राजलक्ष्मी भोसले (पुणे), सुरेखा ठाकरे (अमरावती), रश्मी बागल (करमाळा), वर्षां निकम (यवतमाळ) या आठ महिलांना स्थान मिळाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2018 12:55 am

Web Title: internal dispute in ncp 7
Next Stories
1 सचिन आजरी ; प्राणी संग्रालयातील पांढऱ्या वाघाने सोडले अन्न
2 डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : तिघा संशयीतांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ
3 लातूरमध्ये आठ नगरसेवकांचे पद रद्द
Just Now!
X