News Flash

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद; विधानपरिषद उमेदवारांच्या अंतिम यादीला उशीर

दलित उमेदवाराच्या नियुक्तीवरुन वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभिन्नता

संग्रहित छायाचित्र

दलित उमेदवारावरुन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरु असलेल्या वादामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठीची काँग्रेस पक्षाची यादी मागे घेण्यात आली आहे, असा दावा सुत्रांनी केल्याचा दावा हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तातून करण्यात आला आहे.

राज्यात सध्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागा आहेत. यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष प्रत्येकी चार उमेदवार देणार आहेत. संविधानातील कलम १७१ नुसार, साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील ज्ञान असलेल्या किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या लोकांना विधानपरिषद आमदार म्हणून नियुक्त करु शकतात. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, काँग्रेसची यादी अद्याप अंतिम होत नाहीए. काँग्रेसची तीन नावं निश्चित झाली आहेत. यामध्ये रजनी पाटील, सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन यांच्या नावांचा समावश आहे. मात्र, चौथ्या उमेदवारासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरु असल्याचे कळते.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पक्षाच्या हायकमांडने राज्य काँग्रेसने सुचवलेल्या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, दलित नेते राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कलाकार अनिरुद्ध धोंडुजी वानकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. वानकर यांनी गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

दलित नेत्यांनी काँग्रेसच्या हायकमांडला वानकर यांच्या नावाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण ते पक्षाबाहेरचे उमेदवार असून सतत पक्ष बदलत असतात. वंचित बहुजन आघाडीत जाण्यापूर्वी त्यांनी बसपात गेल्याचाही दावा या नेत्यांनी केला आहे. तसेच या दलित नेत्यांनी पक्षाला इशाराही दिला आहे की, पक्षाने केवळ पक्षनिष्ठ उमेदवार द्यावा अन्यथा त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास राजीनामा देण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.

वानकर यांच्या उमेदवारीची शिफारस ही माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख नितीन राऊत यांनी राजेंद्र करवडे आणि रमेश बागवे यांची नावं सुचवली आहेत. दरम्यान, काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून याबाबत पक्षाचा फिडबॅक मागवला असून आणखी काही नावं सुचवण्यास सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेनेने काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने भाजपातून नुकते राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, गायक आनंद शिंदे, धनगर नेते यशपाल भिंगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची नावं निश्चित केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 2:09 pm

Web Title: internal tussle in congress party in maharashtra so delays legislative council nominations aau 85
Next Stories
1 “अर्णब गोस्वामी यांची अटक काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारची मानसिकता दाखवणारी”
2 …तर माझा नवरा आज जिवंत असता; नाईक यांच्या कुटुंबीयांचा अर्णब गोस्वामींवर आरोप
3 …त्याचीच शिक्षा अर्णब गोस्वामींना भोगावी लागतेय; फडणवीसांनी गांधी कुटुंबावर डागली टीकेची तोफ
Just Now!
X