जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जात आहे. पुरूष दिवसाचं निमित्त साधत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असं आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस राजकारणापासून अलिप्त असल्या तरी राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर त्या भूमिका मांडतात. अनेक वेळा त्या चर्चेतही आल्या. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाचं निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

नॉटी गर्ल आणि संजय राऊत वाद नेमका काय?

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चर्चेत असताना अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. कंगनाच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली होती. “कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे,” असं राऊत म्हणाले होते. त्याचा खुलासा करताना “हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं,” असंही राऊत म्हणाले होते.