आज अनेक क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या जोडीने नाही तर त्यांच्यापेक्षाही थोडं एक पाऊल पुढे जात काम करत आहेत. मग ते शैक्षणिक क्षेत्र असू द्यात किंवा कॉर्पोरेट क्षेत्र आज महिलांनी स्त्री शक्तीचा झेंडा सर्वच क्षेत्रांमध्ये फडकवला आहे. मात्र तरीही काही टिपीकल पुरुष वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात महिलांना काम करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. त्यातही अंगमेहनत किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर ‘असं कसं’वालं प्रश्नचिन्ह उभं राहतं. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्या आऊट ऑफ द बॉक्स जाऊन वेगळ्या क्षेत्राला स्त्रीत्वाची सिलव्हर लायनिंग देत आहे. आजच्या महिला दिनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने अशाच एका वेगळ्या क्षेत्रात म्हणजेच वेल्डींगच्या क्षेत्रात असलेल्या कोमल गणपत चुनारकर हिच्याशी खास गप्पा मारल्या आहेत.

अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून वेल्डींगसारख्या क्षेत्रामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतलेल्या या अवघ्या २४ वर्षीय तरुणीने हे क्षेत्र का निवडले, यात काय आव्हांना तिला समोरे जावे लागले, वेगळ्या क्षेत्रात काम करताना काय अडचणी आल्या याबद्दल दिलखुलास उत्तरे दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तिच्या या वेगळ्या वाटेवरील प्रवासाबद्दल…

प्रश्न > तू या क्षेत्रात येण्याचा निर्णय का घेतलास?
सामान्यपणे वेल्डींगसारखे क्षेत्र हे महिलांसाठी नाही असे समजले जाते. मी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एका वेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या शोधात होते त्यावेळी मला वेल्डींग कोर्सेसबद्दल माहिती मिळाली. आणि त्यातही महिलांसाठी हा कोर्स उपलब्ध असून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते हे मला समजले. तरीही पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या अशा ऑफ बीट क्षेत्रात पाऊल ठेवावे की नाही याबद्दल मी शाशंक होते. तेव्हा मला इन्स्टीट्यूटच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनी या क्षेत्रातील संधींबद्दल माहिती दिली. त्यानंतर मात्र मी या क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रॉक्टीकली विचार करता या क्षेत्रात महिला कमी असल्याने मला स्पर्धेची चिंता करण्याची गरज नव्हती म्हणूनच मी वेल्डींग क्षेत्र निवडले. तसेच मला इतरांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप आधीपासून होती. हा निर्णय घेतल्याने ती इच्छाही पूर्ण झाली असेही म्हणता येईल.

प्रश्न > तू वेल्डींगसारख्या क्षेत्रात काम करते असे सांगितल्यावर लोकांची पहिली प्रतिक्रिया काय असते?
अनेकजण मला तू एक महिला म्हणून चुकीचे क्षेत्र निवडले आहे असा ‘सावधानतेचा’ सल्ला देऊन मोकळे होतात. वेल्डींग सारख्या क्षेत्रात अंगमेहनत जास्त असल्याने ते महिलांचे क्षेत्र नाही असा अनेकांचा समज आहे. मात्र मला तसे अजिबातच वाटत नाही आणि मी माझ्या कामातून त्यांना चुकीचे ठरवत असल्याचा मला विशेष आनंद आहे. आज मी तिकीशा इंजिनियरींग या पुण्यातील कंपनीमध्ये इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर वर्कशॉपमध्ये काम करते आणि हे असं वेगळेपण मला स्वत:ला आवडतेय आणि मी ते एन्जॉय करतेय.

प्रश्न > तुझी कौंटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?
मी चंद्रपूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातून आले आहे. माझ्या घरी आई बाबा आणि दोन छोटे भाऊ आहेत. ते सर्वजण रोजंदारीवर काम करतात. अशावेळी मी चांगल्या कंपनीत काम करुन माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावते याचा मला विशेष अभिमान वाटतो. मागील दोन वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यात थोडीफार का असेना पण यशस्वी झाले आहे. आज माझ्या या वेगळ्या क्षेत्रातील नोकरीमुळे माझ्या कुटुंबाचे गावातील सामाजिक आणि आर्थिक स्थान सुधारले आहे हे मी अभिमानाने सांगू शकते.

प्रश्न > या क्षेत्रात महिलांना कमी प्राधान्य दिले जाते असे तुला वाटते का?
हो हे खरे आहे. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. आधी या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये महिलांची संख्या खूपच कमी होती आज अनेक ठिकाणी महिला या क्षेत्रात काम करताना दिसत आहे.

प्रश्न > एक महिला म्हणून या क्षेत्रात कोणत्या अडचणींना तुला समोरे जावे लागले?
वेल्डींग शिकताना मला काहीच अडचण आली नाही. मला नोकरीही लगचे मिळाली. मात्र जेव्हा नोकरीसाठी मी पुण्याला आले त्यानंतरचा काळ माझ्यासाठी थोडा अवघड केला. स्वत:च्या इच्छाशक्तीवर पुण्यात एकटं येऊन राहण्याचा मी निर्णय घेतल्याने राहण्याच्या जागेपासून ते जेवणाच्या प्रश्नापर्यंतची अनेक अडचणींवर मला उत्तरे शोधावी लागली. त्यातही चंद्रपूरमधून पुण्यासारख्या शहरात येऊन राहताना मला इथल्या शहरी वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. तसेच कंपनीतही मला माझ्या सहकाऱ्यांबरोबर तसेच व्यवस्थापकांबरोबर ट्युनिंग जुळवून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागले. पण जर तुम्ही तुमच्या गुणवत्तेवर ठाम असाल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे.

प्रश्न > तुझ्याकडे पाहून कोणी या क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतली आहे का?
माझे प्रशिक्षण झाल्यानंतर मी कंपनीमध्ये नोकरीला लागले. मी अद्याप कोणाला प्रशिक्षण दिलेले नाही. मात्र मला अशा वेगळ्या क्षेत्रात काम करताना पाहून अनेक मुलींना प्रेरणा मिळते असं त्यांनीच मला सांगितलं आहे.

प्रश्न > अशा वेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा तुझ्या आयुष्यावर किती परिणाम झाला आहे?
आधी सांगितले त्याप्रमाणे या क्षेत्रात येऊन नोकरी करण्यास सुरुवात केल्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. मी आज खूप आत्मविश्वासाने वावरते, लोकांशी सहज संवाद साधू शकते आणि आर्थिक दृष्ट्याही मी सक्षम झाले आहे. तरी येत्या काळात मला माझ्या क्षेत्रातील आणखीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत.

प्रश्न > वेगळ्या क्षेत्रात नाव कमवू पाहणाऱ्या महिलांसाठी तू आजच्या महिला दिनी काय विशेष संदेश देशील?
मी माझ्या क्षेत्रात खूपच नवीन आहे मला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण माझ्या वैयक्तिक अनुभवावरून एवढचं सांगेल प्रत्येक मुलीने स्वत:च्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. योग्य प्रशिक्षण आणि वातावरण असेल तर पुरुष आणि महिला या दोघांमध्ये काहीच फरक नसतो हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं.

  • स्वप्निल घंगाळे
    swapnil.ghangale@loksatta.com