भारतात जे काही वातावरण सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे साहित्यिक कलाकार यांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे देशात असहिष्णुता निर्माण झाली आहे. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे अशी घणाघाती टीका अखिल भारतीय संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली. नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचा मी निषेध करतो या संपूर्ण प्रकरणात महामंडळ कमी पडलं असंही परखड मत देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं. आत्महत्या करणं हा मार्ग नाही आणि उत्तरही नाही हे ना. धो. महानोर यांनी सांगितलेलं वाक्य अगदीच योग्य आहे असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एका कवितेचंही वाचन केलं. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन जे नाकारण्यात आले त्याचा निषेध म्हणून नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून काही दिग्गजांनी निषेध दर्शवला मात्र त्याचा निषेधही करण्यात आले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. नयनतारा सहगल यांच्या विचारांना मी सलाम करतो असे म्हणत लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांचं साहित्यातलं योगदान किती मोठं आहे ते सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या कायम झगडल्या. १९८४ मध्ये शिखांचं शिरकाण झालं तेव्हाही त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रातील थोर विचारवंतांची हत्या झाली त्याचाही नयनतारा सहगल यांनी निषेध केला असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. दादरी येथील अश्पाक हत्याकांडांचा निषेध म्हणूनही त्यांनी पुरस्कार वापसी केली. नयनतारा सहगल या बाणेदार शैलीच्या आहेत. कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी जसा आणीबाणीविरोधात आवाज उठवला होता, तसाच आवाज समाजातल्या अन्यायाविरोधात सहगल यांनी उठवला आहे. पाहुण्याला बोलवायचं आणि मग येऊ नका म्हणायचं हे चांगलं झालेलं नाही यासाठी मी चिंतेत आहे.

देशाला आणि महाराष्ट्राची सहिष्णू परंपरा लोप पावते आहे का? असाही प्रश्न मला यामुळे पडला आहे. नयनतारा सहगल यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला तो होता सर्वसमावेशकता. भारतात आपण धार्मिक विविधता आहे तरीही ऐक्य आहे मात्र ही गोष्ट आपण मागे सोडतो आहोत का? अशी चिंता सहगल यांनी म्हटलं होतं. त्यांची ही खंत योग्यच आहे असेही देशमुख यांनी म्हटले आहे.