परदेशातून आलेल्या करोनाबाधित रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. करोनामुक्त झालेल्या या दुसऱ्या रुग्णाला घरी सोडण्यात आले. बूथ रुग्णालयाच्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करत त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगच्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्या व त्यांच्या संपर्कातील लोकांच्या तपासणीची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

नेवासे तालुक्यातील एक व्यक्ती सहलीसाठी परदेशात गेली होती. मात्र परदेशातून आल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्राव नमुने चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू शोध संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले होते. तपासणीच्या अहवालानंतर त्या व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. गुरुवार, दि. २ रोजी १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आला. दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. आज या रुग्णाची तपासणी करून त्याला घरी सोडण्यात आले. या वेळी बूथ रुग्णालयाच्या डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. आणखी चौदा दिवस त्याला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

करोनाबाधित २० नव्हे तर १७ रुग्ण

नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे. त्यातील दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उर्वरित १५ जणांवर बूथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र काल आरोग्य विभागाने जिल्ह्यात २० रुग्ण सापडल्याचे जाहीर केले होते.दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ४७९ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातील १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात ११० जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर २४० व्यक्तींना घरीच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. आज पुन्हा ७३ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यात कोल्हार, शेवगाव, श्रीगोंदा येथील व्यक्तींचा समावेश आहे.

श्रीगोंदे, कोल्हार, शेवगाव येथे संचारबंदी

निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या कार्यक्रमास जाऊन आलेले व त्यांच्या संपर्कातील १४ लोकांना करोनाची बाधा झाली. या चौदा जणांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. श्रीगोंदे येथील सहा, राहुरी येथील तेरा, प्रवरा परिसरातील २५ जणांना तपासणीसाठी रुग्णालयात विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. संगमनेर येथील पंधरा हजार लोकांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. श्रीगोंदे, कोल्हार, शेवगाव, राहुरी येथे कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तीन दिवस ही संचारबंदी सुरू राहणार आहे.