विश्व साहित्य संमेलनानिमित्त अंदमानला जाणाऱ्या साहित्यप्रेमींवर प्रतिनिधी शुल्काची सक्ती कायम राहिली असती, तर नांदेडसह अन्य ठिकाणांहून येणाऱ्या साहित्यप्रेमींचे वेगळेच संमेलन तेथे भरले असते आणि आपणही त्यात सामील झालो असतो, असा गौप्यस्फोट संमेलनाध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी येथे केला.सक्तीच्या प्रतिनिधी शुल्काच्या वादावर आता पडदा पडला असला, तरी याबाबतच्या प्रस्तावाला संमेलनाध्यक्षांच्या कर्मभूमीतूनच सर्वप्रथम विरोध झाला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने प्रतिनिधी शुल्क ऐच्छिक केले. हा वाद निर्माण झाला, तेव्हा मोरे कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्या-मुंबईत होते.शुल्कसक्ती मागे घेण्यात आल्यावर कर्मभूमीत दाखल झालेल्या मोरे यांचा नागरी सत्कार समितीतर्फे शुक्रवारी  करण्यात आला. या वेळी शुल्कसक्तीवरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.पुण्याच्या ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ या संस्थेकडे विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी असून, या संस्थेमार्फत अंदमानला जाणाऱ्या पर्यटक साहित्यप्रेमींकडून प्रवास-निवास व्यवस्थेच्या खर्चातच प्रतिनिधी शुल्क आकारण्यात आले; परंतु इतर प्रवासी संस्थांच्या माध्यमातून अंदमानला जाणाऱ्या साहित्यप्रेमींकडून प्रत्येकी ३ हजार रुपये सक्तीच्या वसुलीचा प्रस्ताव मांडला गेला. संमेलनाध्यक्षांच्या कर्मभूमीतील साहित्यप्रेमी तसेच मसाप नांदेड शाखेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर यांनी त्यास तीव्र हरकत घेतली होती.नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी आदींच्या उपस्थितीत प्रा. मोरे यांचा स्मृतिचिन्ह, मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी व्यक्त केलेल्या मनोगतात प्रा. मोरे यांनी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नरहर कुरुंदकर यांना अर्पण करीत असल्याचे जाहीर केले.