जालना जिल्हा भाजप अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील सुप्त संघर्ष हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. वर्धापनदिनी दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त जालना शहरात एकाच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. दानवे यांनी जिल्हा कार्यालयात पक्षाचे ध्वजारोहण करून उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर लोणीकर यांनी जालना शहरातील आपल्या निवासस्थानी असलेल्या संपर्क कार्यालयात पक्षाचे ध्वजारोहण करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. लोणीकर दानवे यांच्यातील सुप्त संघर्ष हा नेहमी जालना जिह्यात नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यामुळे या दोन नेत्यांचे वेगवेगळे कार्यक्रमही त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.

जिल्हा भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या सेवेसाठी भाजपची स्थापना झालेली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत १९८० मध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या पहिल्या अधिवेशनास मी उपस्थित होतो. एकेकाळी दोन खासदार असलेला भाजप हा आता देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. केंद्रात आणि देशात सर्वाधिक राज्य सरकारे भाजपची आहेत. लोकसभा असो की विधानसभा  निवडणुकांच्या वेळी दिलेली आश्वासने पाळणारा पक्ष भाजप आहे. देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना केंद्रातील भाजप सरकार राबवीत आहे.

आपल्या संपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बबनराव लोणीकर म्हणाले, भाजप हा तत्त्वनिष्ठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कृषिक्रांती होत आहे. केंद्र सरकारमुळे महाराष्ट्रात करोना उपचाराच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार आहे. या राज्यातील सरकारला जनतेच्या हिताशी काही देणे-घेणे नसून आपले सरकार टिकविणे एवढेच उद्दिष्ट त्यांच्यासमोर आहे.

‘राज्य सरकारमध्ये समन्वय नाही’

राज्यातील महाविकास आघाडीत परस्पर समन्वय नसल्याने वाटेल तसे वागण्याची मोकळीक मंत्र्यांना असल्याचा आरोप भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या स्थापना दिन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. भाजपशी दगाफटका करून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून आणलेले हे सरकार जनतेच्या मनाविरुद्धचे आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले आणि जनतेशी नाळ नसलेल्या सरकारचे भवितव्य महाविकास आघाडीतील मंत्र्यांनाही माहीत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा परस्परांशी समन्वय नसून त्यांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू  असतात. अनिल देशमुख यांच्या संदर्भात झालेल्या १०० कोटी रुपये वसुलीप्रकरणी सीबीआय चौकशीत सत्य बाहेर येईलच. एवढे पैसे मागण्याची हिंमत एकट्या अधिकाऱ्याची होईल असे वाटत नाही, असेही दानवे म्हणाले.