महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली असून, यावरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी राज यांनी केली असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही ते भेट घेणार आहेत. “असे राजरोसपणे खून पडायला लागले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही,” असंही राज यांनी म्हटलं आहे.

मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांना संताप अनावर झाला. “माझे पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्लांचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे. त्यामध्ये नजीम मुल्लांचं नाव आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असं या प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय,” असं राज ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुढे बोलताना राज म्हणाले,”या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार आहे. अशी मंडळी त्यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या, तर हे चित्र चांगलं दिसणार नाही. नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी शरद पवारांची भेट घेणार आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.