निर्बंधामुळे जांभूळ उत्पादक अडचणीत; ऐन उत्पादनाच्या वेळी नुकसान होण्याची भीती

निखील मेस्त्री, लोकसत्ता

पालघर :  टपोऱ्या जांभळांसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर तालुक्यातील बहाडोलीच्या जांभूळ उत्पादकांसमोर करोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. शासकीय निर्बंधांमुळे जांभळाच्या ऐन उत्पादनाच्या वेळी नुकसान होण्याची भीती उत्पादकांना आहे. जांभूळ विक्री करण्यासाठी मोठय़ा अडचणींचा सामना या उत्पादकांना करावा लागणार आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून झाडांना रसाळ टपोरी जांभळे तयार व्हायला सुरुवात होतात.  येथील जांभळांना गुजरात, मुंबई परिसरांतील बाजारपेठेत मोठी मागणी असते.  मधुमेहांसाठी हे फळ उपयुक्त असल्याने ते आवडीने खरेदी करीत असतात.   बहाडोली या एकटय़ा गावातून हजारो किलो जांभूळ मे ते जून या महिन्यात परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली जातात. वसई महामार्गावरील वसई पुलाखाली तसेच दादर स्थानक बाजारपेठ व इतर बाजारपेठा या ठिकाणी घाऊक पद्धतीने या जांभळाची विक्री केली जाते. व्यापाऱ्यांमार्फत घाऊक पद्धतीने खरेदी केल्यानंतर ती लहान लहान विक्रेत्यांना  विक्री होत असते. मात्र यंदा जांभळांना चांगला बहर असला तरी निर्बंधांमुळे घाऊक बाजार विक्रीचे मोठे आव्हान जांभूळ उत्पादकांसमोर आहे. सध्या शासनाने विविध विक्रीवर निर्बंध घातले आहेत. त्यातच भाजीपाला व अत्यावश्यक सेवा यासाठी परवानगी असली तरी ती परवानगी फक्त चार ते पाच तासांची आहे. त्यामुळे जांभूळ झाडावरून काढल्यानंतर ती बाजारपेठेत पोहोचेपर्यंत  वेळ संपणार आहे. त्यामुळे जांभूळ विक्री करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण होणार आहेत.  करोनाचा मोठा प्रादुर्भाव लक्षात घेता हे व्यापारी बहाडोली परिसरात पाठ फिरवत आहेत.   गावात सुमारे १५०० जांभळाची झाडे आहेत दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न  शेतकरी घेत आहेत मात्र  दोन वर्षांंपासून जांभळे विक्रीला उतरती कळा लागल्याने तसेच विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने  उत्पादक हवालदिल झाला आहे.

आर्थिक नुकसान

एका जांभळाचे झाड सुमारे ५०० किलो फळाचे उत्पन्न देत आहे. एका किलोला साधारणपणे ४०० ते ५०० रुपये दर आहे. गावात सर्व उत्पादकांचे मिळून एक हजार झाडे आहेत. यापैकी काही फळे विक्री केली जाणार असली तरी निर्बंधांमुळे १०० टक्के विक्री होणार नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांंपासून जांभूळ फळाला मागणी व त्यासाठी बाजारपेठ असली तरी करोनाकाळामुळे विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यंदाही विक्रीसाठी मोठे आव्हान आहे. या समस्या लक्षात घेता शासनाने जांभूळ उत्पादकांकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा.

– कल्पेश कुडू, जांभूळ उत्पादक,  बहाडोली