टपाल विभागाने जनतेस आर्थिक व्यवहार करतांना सुलभता व्हावी म्हणून ‘आधार अनेबल पेमेंट सिस्टीम’चा वापर सुरू केला असून त्याअंतर्गत आता जन—धन योजनेचे बँकेत जमा झालेले पैसे टपाल कार्यालयातूनही काढता येणार आहेत. खातदाराचे कुठल्याही बँकेतील आधार लिंक बँक खाते ही यासाठी अट असून पैसे घरपोच हवे असल्यास नजीकच्या टपाल खात्यात संपर्क साधून पोस्टमनद्वारा पैसे मिळविता येणार असल्याचे धुळे टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांनी कळविले आहे.

यासंदर्भात पत्रकात रसाळ यांनी म्हटले आहे की, आधार लिंक असलेल्या सर्व बँक आणि टपाल कार्यालयातील खातेदाराला आधार अनेबल पेमेंट सिस्टीम अंतर्गत पैसे प्राप्त करून घेता येणार आहे. या सेवेत प्रधानमंत्री जन-धन बँक खाते, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना खाते यात जमा असलेली रक्कम नजीकच्या टपाल कार्यालयामधून घेता येणार आहे. त्यासाठी ग्राहकाजवळ त्याचा भ्रमणध्वनी नंबर, आधारकार्ड असणे आवश्यक आहे. ही सेवा ग्रामीण भागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये देखील उपलब्ध असून ग्राहकांनी दूरवरच्या बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी गर्दी करण्याऐवजी नजीकच्या टपाल कार्यालयाला भेट देवून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक रसाळ यांनी केले आहे.