खडखड धरणावरील नळपाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात

विजय राऊत, लोकसत्ता

कासा :  खडखड धरणावरील नळपाणीपुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे जव्हार शहर व नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांची प्रतिवर्षी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईतून लवकरच सुटका होणार आहे.

जव्हार शहर व नगर परिषद क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण मे, जून महिन्यात तळ गाठते, त्यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण होते.  लोकसंख्या वाढीने जयसागर धरणाचे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे या धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे  धरणाच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ होणार आहे. तसेच तालुक्यात अस्तित्वात असलेल्या खडखड धरणावरून जव्हार नगर परिषदेला पाणीपुरवठा योजनेचे कामही सुरू करण्यात आले आहे. खडखड धरणातील  १०  टक्के पाणीसाठा जव्हार नगर परिषदेसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या नळपाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मूर्त रूप मिळणार आहे. या नळपाणीपुरवठा योजनेसाठी  १९  कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे.

ही  २२  किलोमीटरची जलवाहिनी योजना आहे. तर जयसागर धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या कामासाठी  सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. खडखड  धरणावरील नळपाणीपुरवठा योजनेची शिरपामाळ येथे यशस्वी चाचणी करण्यात आली आहे, यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, नगरसेवक व अभियंते उपस्थित होते. या दोन्ही योजना पूर्ण झाल्यानंतर जव्हारकरांची  १००  वर्षे पाण्याची चिंता दूर होणार असल्याचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी सांगितले आहे.

खडखड धरणावरील नळपाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदरचे काम  ऑगस्टपर्यंत  पूर्ण होणे अपेक्षित आहे. संबंधित कंत्राटदारास ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

– प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद